आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या पुलवामात एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला. दहशतवादी एका कारमध्ये स्फोटके भरून ब्लास्ट करण्याच्या तयारीत होते. हल्ला उधळल्यानंतर बॉम्ब शोध पथकाने कारमधील बॉम्ब एका निर्जनस्थळी उडवले. या प्रकरणाचा तपास आता एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ईदच्या जवळपास 10 दिवसांपूर्वी जंग-ए-बदरच्या दिवशी दहशतवाद्यांनी हल्ल्याचा कट रचला होता. पोलिस आणि लष्कराने दक्षता घेतली होती. तसेच हल्ला निकामी करण्यासाठी शोध मोहिम सुद्धा सुरू केली.
काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी केली होती. त्यात बुधवारी रात्री एक दहशतवादी कार घेऊन निघाला असताना त्याला अडवण्यात आले. त्याने गाडी थांबवली नाही तेव्हा फायरिंग करण्यात आली. परंतु, या चकमकीदरम्यान तो दहशतवादी पोलिसांना चकवा देत पसार झाला. यानंतर पुढे जाउन त्याने गाडी थांबवली आणि कार तशीच सोडून आंधाराचा गैरफायदा घेत पळून गेला. पोलिसांनी दुसऱ्या तपास नाक्यावर सापडलेल्या त्या कारमधील बॉम्ब निकामी करण्यासाठी बॉम्ब शोध पथकाला बोलावले. ही स्फोटके कारमध्ये एका निळ्या रंगाच्या बॅरलमध्ये ठेवण्यात आली होती.
गाडी चालवणारा होता हिज्बुलचा दहशतवादी
पांढऱ्या सँट्रो कारचा क्रमांक प्रत्यक्षात एका बाइकचा नंबर होता. त्याचा मालक जम्मूच्या कठुआ येथील रहिवासी होता. या कारचा चालक हिज्बुल मुजाहिद्दीनचा सदस्य आदिल होता. योगा-योग म्हणजे, यापूर्वीच्या पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफला लक्ष्य करणाऱ्या आत्मघातकी कारच्या ड्रायव्हरचे नाव सुद्धा आदिल होते. 2019 च्या पुलवामा हल्ल्याला बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याच दिवसानिमित्त हा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. 2019 च्या पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलिस दल) चे 40 जवान शहीद झाले होते.
स्फोटके लावण्यात पाकिस्तानी दहशतवाद्याचा हात!
पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितल्याप्रमाणे, आयईडी स्फोटके बनवणे आणि ते कारमध्ये लावण्यात पाकिस्तानी दहशशतवादी आणि जैशचा कमांडर वलीदचा हात असू शकतो. वलीद सध्या कुलगाममध्ये लपून बसल्याची सुद्धा माहिती आहे. डीजीपी सिंग म्हणाले, की कारवर टूव्हीलरचे नंबर लावण्यात आले होते. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांनी असे केले होते. कार हायवेच्या दिशेने जाणार होती. याच कारच्या माध्यमातून दहशतवादी सुरक्षा रक्षकांच्या समूहाला लक्ष्य करणार होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.