आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जम्मू-काश्मीरमधील नगरोटा इथे झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले होते. या घटनेची माहिती सगळीकडे प्रसिद्ध झाली. पण, नगरोटामध्ये मारले गेलेले दहशतवादी एका मोठ्या उद्देशाने सीमेपलीकडून भारतात घुसवण्यात आले होते. याबद्दलचा मोठा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका बैठकीत केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी सकाळी काश्मीरच्या नगरोटामध्ये झालेल्या एनकाउंटरवर रिव्ह्यू मीटिंग केली. बैठकीत गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल आणि गुप्तचर संस्थांचे टॉप अधिकारी उपस्थित होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत हे समोर आले की, नगरोटा चकमकीत ठार झालेले जैशचे दहशतवादी भारतात 26/11 सारख्या मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते. परंतू, सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचा डाव उद्ध्वस्त झाला.
यादरम्यान, पंतप्रधानांनी सुरक्षा दलाच्या सतर्कतेचे कौतुक केले. ते म्हणाले की, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे चार दहशतवादी ठार झाल्याने मोठा अनर्थ टळला. त्यांच्याकडून जप्त केलेल्या शस्त्र साठ्यावरुन स्पष्ट दिसत आहे की, ते मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते.
दहशतवाद्यांनी निवडणुकीपूर्वी मोठ्या हल्ल्याची प्लॅनिंग केली
सूत्रांनी सांगितले की, दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असू शकतात. गुरुवारी जम्मू झोनचे IG मुकेश सिंह म्हणाले की, दहशतवादी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते. निवडणुका 28 नोव्हेंबर ते 19 डिसेंबरदरम्यान 8 फेजमध्ये होणार आहेत.
शकरगडमधून भारतीय सीमेत दहशतवादी दाखल झाले
सैन्य, CRPF आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुरुवारी सकाळी ट्रकमध्ये लपून येणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या 4 दहशतवाद्यांना ठार केले. अधिकाऱ्याने सांगितले की, हे दहशतवादी शकरगडमधून भारतीय सीमेत दाखल झाले होते. येथे पाकिस्तानी रेंजर्सचे हेडक्वार्टर आहे आणि या घुसखोरीमध्ये दहशतवाद्यांना त्यांची मदत मिळाली असू शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.