आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आज दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. किशिदा हे 19 आणि 20 मार्च रोजी नवी दिल्लीत असतील. जपानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर किशिदा यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. या दौऱ्यात किशिदा हे आगामी पाच वर्षात 42 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. तसेच या भेटीदरम्यान किशिदा आणि पंतप्रधान मोदी दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध आणि द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा करतील.
भारत आणि जपान यांच्यात14 वी शिखर परिषद ही साडेतीन वर्षांच्या कालावधीनंतर होत आहे. भारत-जपान वार्षिक शिखर परिषद 2018 साली टोकियो येथे झाली होती. या परिषदेमुळे दोन्ही राष्ट्रांना विविध क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेण्याची आणि संबंध भक्कम करण्याची संधी मिळेल. भारत-प्रशांत प्रदेशात आणि त्यापलीकडे शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी भागीदारी पुढे नेण्यासाठी दोन्ही नेते परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करतील.
वृत्तानुसार, शिंजो आबे हे जपानचे पंतप्रधान असताना 2014 मध्ये त्यांनी भारतातील गुंतवणुकीबाबत निर्णय घेतला होता. शिंजो आबे यांनी 3.5 ट्रिलियन येन गुंतवणुकीची घोषणा केली होती. आता किशिदा हे 5 ट्रिलियन गुंतवणुकीची घोषणा करू शकतात. किशिदा यांनी 4 ऑक्टोबर 2021 रोजी जपानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती.
जपान महत्त्वाचा देश -
जपान हा भारताचा प्रमुख विकास भागीदार असून थेट विदेशी गुंतवणुकीत भारताचा 5वा सर्वात मोठा स्रोत आहे. पंतप्रधान मोदींनी 2014 मध्ये जपानला भेट दिली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. शिंजो आबे हे त्यावेळी जपानचे पंतप्रधान होते. तेव्हा जपानने भारतासाठी 3.5 ट्रिलियन येन गुंतवणुकीची घोषणा केली होती. भारतात सध्या 1455 जपानी कंपन्या आहेत. राजस्थानमधील नीमराना आणि आंध्र प्रदेशातील काही शहरांमध्ये जपानच्या जास्तीत जास्त कंपन्या कार्यरत आहेत. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉर, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, मेट्रो प्रकल्प आणि दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्प, जपानच्या सहाय्याने अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचे काम भारतात सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.