आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:बँकेतून निवृत्तीनंतर मुलींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ६४ व्यावर्षी अभ्यास करून ‘नीट’ उत्तीर्ण; आता हाेणार एमबीबीएस

बुर्ला (ओडिशा)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एमबीबीएसमध्ये प्रवेशासाठी वयाेमर्यादा नाही, त्याचे हे देशातील बहुतेक पहिलेच प्रकरण

ओडिशाच्या ६४ वर्षीय जयकिशोर प्रधान यांचा जोश आणि जिद्द तरुणांना लाजवणारी आहे. त्यांनी यंदा राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) उत्तीर्ण केली. यानंतर वीर सुरेंद्र साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च संस्थेत (विमसार) एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी त्यांनी प्रवेश घेतला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियातून उपव्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेले जयकिशोर म्हणाले, ‘मी १९७४ मध्ये बारावीनंतर मेडिकलच्या परीक्षेला बसलो. मात्र यश आले नाही. फिजिक्समध्ये बीएस्सी केले. एका शाळेत शिक्षक म्हणून लागलो. दरम्यान, बँकेच्या प्रवेश परीक्षा दिल्या. इंडियन बँकेत रुजू झालो. १९८३ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरी मिळाली. १९८२ मध्ये वडील आजारी पडले. त्यांना बुर्ला सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व वेल्लोरच्या ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यानंतर पुन्हा डॉक्टर होण्याच्या इच्छेने उचल खाल्ली. मात्र वयाेमर्यादेमुळे काहीच करता आले नाही.’

जयकिशोर सांगतात, ‘३० सप्टेंबर २०१६ ला निवृत्तीनंतर जय पूर्वा व ज्योती पूर्वा या जुळ्या कन्यांच्या माध्यमातून निर्धार केला. दोघांनी डॉक्टरीच्या शिक्षणासाठी प्रेरणा दिली, तयारीही करवून घेतली. दोघांचा बीडीएसला नंबर लागला.’ २०१९ मध्ये सुप्रीम कोर्टाने २५ वर्षांवरील लोकांनाही नीट परीक्षा देण्याची परवानगी दिली. त्याच वर्षी मीही नीट परीक्षा दिली. मात्र यश मिळाले नाही. त्याचा अनुभव २०२० च्या परीक्षेत कामी आला.’ प्रधान यांनी सप्टेंबरमध्ये नीट दिली. अॉक्टोबरमध्ये निकाल आला. मात्र २० नोव्हेंबरला एका अपघातात थोरली कन्या जय पूर्वाचा मृत्यू झाला. जयकिशोर म्हणाले, ‘एमबीबीएस करण्यासाठी मला सर्वात जास्त प्रेरणा तिनेच दिली होती. आज ती हयात असती तर सर्वात जास्त आनंद तिलाच झाला असता.’ आता जयकिशोर प्रधान हे वयाच्या सत्तरीत एमबीबीएसची पदवी मिळवतील.

स्वत: दिव्यांग, गरिबांवर मोफत उपचार करण्याचा मनोदय केला व्यक्त
जयकिशोर प्रधान दिव्यांग आहेत. पायात बसवलेल्या स्प्रिंगद्वारे ते चालू शकतात. ते म्हणाले, ‘डॉक्टर म्हणून प्रशिक्षण घेतल्यानंतर गरिबांवर मोफत औषधोपचार करायचे आहेत. विमसारचे अधिष्ठाता ब्रजमोहन मिश्रा म्हणाले, ‘एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेशासाठी आता वयोमर्यादा नाही. प्रधान या शैक्षणिक सत्रापासून सुरू होणाऱ्या वर्गांमध्ये बसतील. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांपैकी सर्वात जास्त वयस्कर आहेत.’

बातम्या आणखी आहेत...