आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jharkhand Congress MLA Purchase Case; BJP Leader Chandrasekhar Bavankule's Name; News And Live Updates

झारखंड काँग्रेस आमदार खरेदी प्रकरण:भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव; सोरेन सरकार उलथवण्यासाठी 1 कोटी रु. अॅडव्हान्स देण्याची तयारी

रांची3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेसच्या 3 आमदारांसोबत दिल्लीत नेत्यांची भेट : आरोपीचा दावा

हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंडमधील झामुमो-काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी आमदारांची खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले. या खरेदीसाठी विदर्भातील भाजप नेते तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, काटोलचे माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर आणि जयकुमार बेलखेडे या भाजप नेत्यांची नावे आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी अभिषेक दुबे याने दिलेल्या कबुलीजबाबात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची नावे घेतली आहेत.

काँग्रेसचे दोन आमदार उमाशंकर अकेला, इरफान अन्सारी आणि अपक्ष आमदार अमितकुमार यादव यांच्यासह १५ जुलै रोजी दिल्लीला गेलो होतो. तेथे महाराष्ट्रातील भाजपच्या दोन नेत्यांशी आमदारांचा व्यवहार ठरला होता. एक कोटी रुपये अॅडव्हान्स मिळणार होते. पण अॅडव्हान्स न मिळाल्याने आमदार रांचीला परतले. दिल्लीला जाण्यासाठी या सर्वांची तिकिटे महाराष्ट्रातील एक व्यावसायिक जयकुमार बेलखेडे यांनी काढली होती. दिल्लीत व्दारका येथील विवांता या पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली. त्यानंतर बावनकुळे, चरणसिंग यांच्यासह काही नेत्यांच्या घरी गेलो, असा दावा अभिषेक दुबे याने केला आहे. दुबे याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली होती.

१६ जुलैला अनेक नेत्यांना भेटले तिन्ही आमदार
१६ जुलैला सकाळी १० वाजता तिन्ही आमदारांना घेऊन बेलखेडे, बावनकुळे आणि चरणसिंह यांनी अनेक नेत्यांसोबत दिल्लीत बैठक घेतली. तेथे आमदारांना एक कोटी रुपये अॅडव्हान्स देण्याबाबत चर्चा झाली. पण आमदारांना रक्कम अॅडव्हान्समध्ये मिळाली नाही. त्यामुळे ते सर्वजण नाराज झाले आणि त्याच दिवशी ३.५५ वाजेच्या विमानाने रांचीला परतले. रांचीला आल्यानंतर सर्वजण आपापल्या मतदारसंघांत निघून गेले. आमदार परत गेल्यानंतरही बेलखेडे त्यांच्या संपर्कात होते.

२१ जुलैला बेलखेडे इतर तिघांसोबत गेले रांचीला
२१ जुलैला जयकुमार बेलखेडे यांच्यासह चार जण दुपारी २.३० च्या विमानाने मुंबईहून रांचीला गेले. हॉटेल ली लॅकमध्ये ४०७, ३०७, ३१० आणि ६११ या क्रमांकाच्या खोल्या बुक केल्या. रांचीत त्यांनी अनेक आमदारांशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. हॉटेलमध्ये आल्यानंतर बेलखेडे यांनी अभिषेक दुबेला फोन करून बोलावले. दुबेने सांगितले की, बोकारो येथील अमितकुमार व संतोषकुमार दोन आमदारांशी व्यवहार ठरवत होते.

छाप्यापूर्वी हॉटेलमधून निघून गेले मुंबईहून आलेले ४ जण
अभिषेकने सांगितले की, आमदारांच्या खरेदीसाठी जे चार जण येथे आले होते, ते २२ जुलैच्या रात्री पोलिस येण्याच्या २० मिनिटे आधीच निघून गेले. हॉटेलमध्ये मी एकटाच होतो. पोलिसांनी मला पकडले. मी चौघांचे पत्तेही सांगितले. १) मोहित भारतीय : वल्लभभाई रोड, लिंक रोडसमोरील अॅव्हेन्यू, सांताक्रूझ, पश्चिम मुंबई. २) अनिलकुमार : पूजा कासा बिल्डिंग, फ्लॅट नंबर ४०१, चौथा मजला, बांद्रा, पश्चिम मुंबई ३) आशुतोष ठक्कर : तिसरा मजला, भावसागर, दत्त मंदिर रोड, मालाड, पूर्व मुंबई. ४) जयकुमार बेलखेडे : गौरीबाग चौक, कारंजा, वर्धा.

बावनकुळे म्हणतात, मी तर उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर होतो....
नागपूर | झारखंडमधील सरकार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या आमदार खरेदीप्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधला असता माझे नाव या प्रकरणात कसे आले हे माहिती नाही. मी १९ जुलैपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अाहे. सध्या जालना येथे असून सोमवारी नागपुरात येत असल्याचे बावनकुळे म्हणाले. मात्र १५ -१६ जुलै रोजी आपण कुठे होता, असे विचारले असता त्यांनी एेकू येत नसल्याचे सांगून फोन कट केला.झारखंडमध्ये दाखल एफआयआरमध्ये जयकुमार बेलखेडे यांचेही नाव नमूद केले असून ९२८४८६६३११ हा भ्रमणध्वनी दिलेला आहे. त्यावर संपर्क साधला असता तो स्विचआॅफ होता. भाजप नेेते चरणसिंग ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, काटोलमधलेच काम सांभाळत नाही, तिथे झारखंडमध्ये जाण्याची फुरसत आहे कुठे ?

बातम्या आणखी आहेत...