आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार खरेदी प्रकरण:झारखंड पोलिसांचे पथक मुंबईत; बावनकुळेंची चौकशी करणार, नागपूर भाजपचे चरणसिंग, बेलखेडे चाैकशीच्या फेऱ्यात

रांची3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडमधील झामुमो-काँग्रेस आघाडी सरकार पाडण्यासाठी कट उघडकीस आल्यानंतर झारखंड पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे. या कटात सहभागी भाजप प्रदेश सरचिटणीस तथा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर, व्यावसायिक जयकुमार बेलखेडेंसह ६ जणांची पोलिस चाैकशी करणार आहे.

काँग्रेसचे दोन आणि एका अपक्ष आमदार खरेदीप्रकरणी राजधानी रांची येथून ४ पथके महाराष्ट्र आणि दिल्लीत तपासासाठी निघाली आहेत. खलारी येथील पोलिस उपअधीक्षक अनिमेश नैथानी यांच्या नेतृत्वाखालील एक पथक सोमवारी दिल्लीत पोहोचले. हे पथक हाॅटेल विवांतामध्ये चाैकशी करीत आहे. याप्रकरणी अटकेतील अभिषेक दुबे याने विवांता हाॅटेलमध्ये तीन आमदारांसोबत बोलणी झाल्याचे सांगितले होते. दरम्यान, बावनकुळे दाेन दिवस दिल्लीतच हाेते. याची पुष्टी भाजप पदाधिकाऱ्यांनीही केली. मंत्री नसल्यामुळे त्यांचा दाैरा फक्त भाजप वर्तुळातच माहिती हाेता, नंतर हा दाैरा त्यांनी डिलीट करावयास लावला, अशी माहिती नागपूरच्या एका भाजप कार्यकर्त्याने दिली.

दरम्यान, झारखंड पोलिसांच्या तपासात अनेक रंजक गोष्टी समोर येत आहेत. दि. १५ जुलै सायंकाळी ६.१० च्या रांची-दिल्ली इंडिगो विमान क्र. ६ ई- २३२८ चा पीएनआर ओएमझेडएमआरडब्ल्यू आणि आयजीसीटी २व्ही चा तपशील पोलिसांनी शोधला आहे. त्यानुसार एका पीएनआरवर तीन आणि दुसऱ्या पीएनआरवर चार जणांनी प्रवास केला होता. दिल्लीला जाणाऱ्या आमदारांमध्ये उमाशंकर अकेला, इरफान अन्सारी आणि अमित यादव यांची नावे समोर आली आहेत. या तीन आमदार व उमाशंकर अकेला यांचा नातू हर्षवर्धन हा सुध्दा सोबत होता. पोलिस त्याचीही चौकशी करणार आहेत.

हॉटेल ली लॅकच्या तीन खोल्यांची ४ दिवसांची ऑनलाइन बुकिंग : एक्सपीडिया अॅपवरुन हॉटेल ली लॅकमधील ४ रुम्स बुक करण्यात आल्या होत्या. ही बुकींग २१ ते २४ जुलैसाठी होती. मुंबईहून गेलेले आशुतोष ठक्कर, मोहित भारतीय आणि अनिल यादव यांनी २१ जुलै रोज हॉटेल लीलॅकमध्ये चेक इन केले होते. ठक्कर खोली क्र.३०७, मोहित भारतीय खोली क्र.३१०, जय बेलखेडे खोली क्र.४०७ आणि अनिल यादव खोली क्र. ६११ मध्ये थांबले होते. परंतु २२ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता पोलिस छापा टाकण्यासाठी पोहोचण्यापूर्वी २० मिनीटे अगोदर हे सर्व हॉटेलमधून पसार झाले.

आमदार फोडाफोडीचे पैसे पूरग्रस्तांना देता आले असते : राष्ट्रवादी काँग्रेस
राज्यात पूरपरिस्थितीमुळे लोक संकटात असताना भाजपचे लोक आमदार फोडण्यासाठी पैसे घेऊन जात आहेत. एका आमदारासाठी कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखविण्यात येत आहे. पूरपरिस्थितीत हे पैसे लोकांच्या मदतीसाठी देता आले असते, मात्र सरकार पाडण्यासाठी भाजपची यंत्रणा संकटातही काम करत आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. झारखंडचे सरकार कोसळणार तर नाहीच, पण महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस वगैरे काही होणार नाही. भाजपला आता ते शक्यही नाही, असा दावा मलिक यांनी केला.

रांची पोलिसांची चार पथके अन् त्यांची जबाबदारी
टीम १
: दिल्लीतील हॉटेल विवांतामध्ये चौकशी करीत आहे. आरोपींनी भेट घेतलेल्या नेत्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करीत आहे.

टीम २ : महाराष्ट्रात पोहोचली आहे. मुंबईहून रांची येथे आलेले व्यावसायिक आशुतोष ठक्कर, मोहित भारतीय, जय बेलखेडे आणि अनिल यादव यांंच्यासह भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि चरणसिंग यांची चौकशी करणार आहे.

टीम ३ : सायबर पोलिस उपअधीक्षक यशोधरा यांच्या नेतृत्वाखालील पथक रांचीतील लीलेक हॉटेलमधील बुकिंग,ऑनलाइन पेमेंट, मोबाइल कॉल्सची माहिती घेत आहे.

टीम ४ : तपास अधिकारी प्रभात रंजन बरवार यांच्या नेतृत्वाखालील पथक आमदार इरफान अन्सारी, उमाशंकर अकेला आणि अमित यादव यांची चाैकशी करणार आहे.

सरकार पाडण्याची माझी कुवत नाही : चंद्रशेखर बावनकुळे
मी झारखंडला कधीच गेलाे नाही आणि तिथे माझे कोणी ओळखीचे नाही. मी महाराष्ट्र भाजपचा सरचिटणीस म्हणून काम करणारा एक लहान कार्यकर्ता आहे. सरकार पाडण्याची माझी कुवत नाही, असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिले. ते म्हणाले, चरणसिंग ठाकूर काटोल विधानसभेचे माजी उमेदवार आहेत. ते व जयकुमार बेलखेडे यांचे नेहमी नागपुरात जाणे-येणे असते. आमच्या नेहमी गाठीभेटी होतात. तेही माझ्यासारखेच लहान कार्यकर्ते आहेत.

बावनकुळे दिल्लीतच होते ः भाजप नेते चरणसिंग ठाकूर
नागपूर | १५ जुलै रोजी मी आणि चंद्रशेखर बावनकुळे सोबतच दिल्लीला गेलो. आमचा ऑफिशियल दौरा होता, अशी माहिती भाजप जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांनी दिली. काटोल नगर परिषदेचे पंतप्रधान आवास याेजनेचे अनुदान अडले होते. म्हणून बावनकुळे यांच्यासोबत मीही गेलो. त्यांनीच माझे तिकीट काढले. मी दुसऱ्या दिवशी १६ जुलै रोजी परत आलो, तर बावनकुळे इतर मंत्र्यांकडील कामासाठी तिथेच थांबले, असे ठाकूर यांनी सांगितले.

सीसीटीव्ही फुटेज तपासणार : नैथानी यांच्या नेतृत्वाखालील झारखंड पोलिसांचे पथक हॉटेल विवांतामधील सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहे. तर मुंबईत आलेले पथक २१ जुलै रोजी रांंची येथील हॉटेल लीलेकमध्ये थांबलेल्या चार जणांची चौकशी करणार आहे. दरम्यान, याप्रकरणी अटकेत असलेले अभिषेक दुबे, अमितसिंह आणि निवारण प्रसाद महतो यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...