आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजोधपूरमध्ये सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गट समोरासमोर आले. यादरम्यान रात्री उशिरा जालोरी गेट चौकात दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली. पोलीस आणि आरएसी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर दोन्ही बाजूच्या लोकांची समजूत घातल्यानंतर प्रकरण शांत झाले. मात्र, रात्री उशिरा एका गटातील लोक परत आल्याने प्रकरण पुन्हा तापले. रात्री उशिरापर्यंत जालोरी गेट आणि ईदगाह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वास्तविक, जालोरी गेट चौकात काही लोक झेंडे लावत होते. यादरम्यान व्हिडिओ बनवणाऱ्या एका व्यक्तीला काही तरुणांनी मारहाण केली. काही लोक मदतीला आले असता त्यांनाही मारहाण झाली. यानंतर दुसऱ्या गटाने समोरच्या गटावर दगडफेक सुरू केली.
एकदा शांत झाले, मग पुन्हा परतला जमाव
दोन्ही बाजूंमध्ये बराच वेळ दगडफेक आणि गोंधळ सुरू होता. यामध्ये एका माध्यमकर्मीसह काही लोक जखमी झाले आहेत. जालोरी गेट चौकीवरही दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी त्यांना हाकलून देऊन आणि समजावून सांगून 12:30-1 वाजता एकदाचे प्रकरण शांत केले. पोलिसांनी संपूर्ण चौकात नाकेबंदी केली.
यादरम्यान एक बाजू जालोरी गेटजवळ जमा झाली, तर दुसरी बाजू ऑक्सफर्ड शाळेजवळच्या परिसरात गेली. थोड्या वेळाने दोन नेते जालोरी गेटवर आले आणि त्यांनी पोलिसांशी चर्चा केली, नंतर निघून गेले. यानंतर काही वेळातच 1:15-1:30 वाजता ऑक्सफर्ड शाळेच्या रस्त्यावरून जमाव आला आणि जोरात दगडफेक केली. हे पाहून दुसऱ्या बाजूनेही जालोरी गेटच्या बाजूने दगडफेक झाली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी ऑक्सफर्ड शाळेच्या दिशेने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
डीसीपी-एसएचओसह अनेक जखमी
या दगडफेकीत उदयमंदिरचे एसएचओ अमित सिहाग आणि डीसीपी पूर्व भुवनभूषण यादव हेही जखमी झाले आहेत. पोलिसांनी पाठलाग करून लोकांना पिटाळून लावले. यानंतर जबता ईदगाह रोड आणि जालोरी गेट चौकात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जालोरी गेटकडे जाणारे अनेक रस्ते बॅरिकेडिंग करून अडवण्यात आले होते. रात्री उशिरा सूरसागरच्या आमदार सूर्यकांता व्यास आणि महानगरपालिकेच्या दक्षिण महापौर वनिता सेठही घटनास्थळी पोहोचल्या आणि रात्री अडीच वाजेपर्यंत पोलीस चौकीच्या बाहेर बसून होत्या.
मुख्यमंत्री गेहलोत यांनी केले ट्वीट
या घटनेनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट केले की, “जोधपूरच्या जालोरी गेट येथे दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षामुळे तणाव निर्माण होणे दुर्दैवी आहे. कोणत्याही परिस्थितीत शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जोधपूर, मारवाडच्या प्रेम आणि बंधुभावाच्या परंपरेचा आदर करत मी सर्व पक्षांना शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.