आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Justice Nariman Retires After Ruling On Sabarimala; The Lion Who Protects The Judiciary Will No Longer Be With Him: Chief Justice Ramana; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:सबरीमालावर निकाल देणारे न्यायमूर्ती नरिमन निवृत्त; न्यायपालिकेचे संरक्षण करणारा सिंह आता सोबत असणार नाही : सरन्यायाधीश रमणा

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बारमधून थेट सुप्रीम कोर्टाच्या पीठावर बढती मिळालेले न्यायमूर्ती नरिमन पाचवेच वकील

सबरीमाला खटल्यातील सर्वोच्च न्यायालयातील दुसरे ज्येष्ठ न्यायमूर्ती रोहिंटन फली नरिमन गुरुवारी निवृत्त झाले. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी त्यांना निरोप दिला. या कार्यक्रमात सरन्यायाधीश रमणा म्हणाले, ‘न्यायमूर्ती नरिमन निवृत्त झाले आहेत. त्यामुळे न्यायालयीन संस्थेचे रक्षण करणारा हा सिंह आता आपल्यासोबत असणार नाही. ते तत्ववादी व्यक्ती आहेत, त्यांच्या जीवनात आणखी अनेक अध्याय लिहिले जातील. न्यायमूर्ती नरिमन हे कायदेशीर कौशल्याचे भांडार आहेत.’

परंपरेनुसार कामाच्या शेवटच्या दिवशी न्यायमूर्ती नरिमन यांनी सरन्यायाधीशांसोबत एका पीठात सुनावणी केली. वकील संघातून सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती देण्यात आलेले न्यायमूर्ती नरिमन हे ५ वे वकील होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांनी १३,५६५ प्रकरणे निकाली काढली आहेत. १९९३ मध्ये वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षीच त्यांची ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून नियुक्ती झाली होती. त्यासाठी नियम बदलावे लागले होते. आधी ज्येष्ठ विधिज्ञ होण्यासाठी किमान वय ४५ वर्षे निश्चित करण्यात आले होते.

निरोप समारंभात सरन्यायाधीश रमणा यांनी न्यायमूर्तींच्या कथित साध्या जीवनपद्धतीबद्दल टिप्पणी केली. ते म्हणाले की, आम्ही न्यायालयाच्या सुट्यांमध्येही काम करतो. संशोधन करतो. प्रलंबित निकाल लिहितो. पण न्यायमूर्तींच्या साध्या आयुष्याबद्दल खोट्या आख्यायिका बनवल्या जातात, तेव्हा ही गोष्ट पचवणे कठीण होते. लोकांच्या मनात आणखी एक चुकीची धारणा आहे. ती म्हणजे न्यायमूर्ती मोठ्या बंगल्यांत राहतात, सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंतच काम करतात आणि आपल्या सुट्यांचा आनंद घेतात, पण हे असत्य आहे.

माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ अ वर दिला महत्त्वाचा निकाल
केरळच्या सबरीमाला मंदिर प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्तींत नरिमन यांचा समावेश होता. मंदिरात १० ते ५० वर्षांच्या महिला प्रवेश करू शकतात, असा निकाल या पीठाने दिला होता. परंपरेनुसार तेथे या वयोगटातील महिलांना जाण्यास बंदी होती. त्यांनी २०१५ मध्ये श्रेया सिंघल खटल्यात निकाल दिला होता. त्यात आयटी कायद्यातील कलम ६६ अ रद्द केले होते. त्याअंतर्गत सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्याला पोलिस अटक करू शकत होते. न्यायमूर्ती नरिमन हे कलम ३७७, दिवाळखोरी आणि नादारी संहिता तसेच नेत्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड जाहीर करावे या मुद्द्यांवर निकाल देणाऱ्या पीठात होते. सुप्रीम कोर्ट अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी जाधव म्हणाले की, न्यायमूर्ती नरिमन निकाल देण्यास उशीर करत नव्हते. ते निकाल राखून ठेवल्यानंतर दोन ते तीन दिवसांतच निकाल देत होते.

बातम्या आणखी आहेत...