आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kailash Vijayvargiya Controversial Remark; Advice Wear Proper Cloth | Congress On BJP

वादग्रस्त:मुली एवढे वाईट कपडे घालून बाहेर पडतात की त्या शूर्पणखा वाटतात, भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान; काँग्रेसची टीका

इंदूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुली एवढे घाणेरडे कपडे घालून बाहेर पडतात की, त्या बिल्कुल शूर्पणखा वाटतात, असे वादग्रस्त विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात ते मुलींना चांगले व योग्य कपडे घालण्याचा सल्ला देत आहेत. त्यांनी तरुणांतील वाढत्या व्यसनांधतेवरही संताप व्यक्त केला.

काय म्हणाले विजयवर्गीय?

'मी आजही बाहेर जातो तेव्हा मला सुशिक्षित तरुण-तरुणी नाचताना पाहून मला त्यांच्या थोबाडीत 5-6 द्याव्याशा वाटतात. असे केले तर त्यांची नशा उतरेल. खरे सांगतो, देवा शपथ. हनुमान जयंतीला मी खोटे बोलणार नाही. मुलीही खूप घाणेरडे कपडे घालून बाहेर पडतात...आपण महिलांना देवी म्हणतो. पण या मुलींमध्ये देवीचे रूप दिसत नाही. त्यात शूर्पणखा दिसते. खरेच देवाने त्यांना किती सुंदर शरीर दिले आहे. थोडे चांगले कपडे घाला. मुलांमध्ये संस्कार रुजवा. मला खूप काळजी वाटते.'

विजयवर्गीय इंदूरच्या एअरपोर्ट रोडवरील महावीर बागेत एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी मुलींचे पेहराव व तरुणांमधील अंमली पदार्थांच्या व्यसनावर चिंता व्यक्त केली.

कैलाश विजयवर्गीय भगवान महावीर व हनुमानजींच्या व्यक्तिमत्त्वावर बोलत होते. ते म्हणाले की, इंदूर प्रत्येक गोष्टीत अव्वल क्रमांकावर आहे. युवक हे या देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांचे आचरण संयमी व संतुलित असेल, तरच त्यांना राष्ट्र उभारणीत सुवर्ण योगदान देता येईल. पण ते ड्रग्जचे बळी ठरले, तर कोणत्या प्रकारचे राष्ट्र निर्माण होईल, याचा विचार करा.

व्यसनांधतेवर चिंता

कैलाश विजयवर्गीय यांनी यापूर्वीही अनेकदा ड्रग्जच्या आहारी जाणाऱ्या तरुणांवर चिंता व्यक्त केली आहे. गत महिन्यात पितृ पर्वत येथे आयोजित हनुमान चालीसा पठणाच्या कार्यक्रमात त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्यासमोर आपली चिंता व्यक्त केली होती. तरुणांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी आपण एक मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. याद्वारे तरुणांना अध्यात्माशी जोडण्याचा आपला विचार आहे, असे ते म्हणाले होते.

भाजपला महिलांचा अवमान करण्याची सवय -काँग्रेस

दुसरीकडे, काँग्रेसने विजयवर्गीय यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. काँग्रेस म्हणाली - भाजपला महिलांचा अवमान करण्याची सवय आहे. काँग्रेसचे मीडिया प्रभारी पियुष बबेले यांनी ट्विट केले की, मुली आता काय घालणार, हे भाजप ठरवेल.

विजयवर्गीय यांच्या विधानावर काँग्रेसचे मीडिया प्रभारी पीयुष बबेले यांनी ट्विट केले.
विजयवर्गीय यांच्या विधानावर काँग्रेसचे मीडिया प्रभारी पीयुष बबेले यांनी ट्विट केले.

सारवासारव

या प्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर विजयवर्गीय यांनी यासंबंधी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले - माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. रस्त्यात तंग कपडे घातलेली एक तरुणी मद्यधुंद स्थितीत तमाशा करत होती. तिला शूर्पणखा नाही तर काय म्हणावे? मुलींना त्यांच्या पसंतीचे कपडे घालण्याचा अधिकार आहे. आपण आपल्या मुलींना देवीचा दर्जा देतो. पण मी जे काही पाहिले ते शहराच्या संस्कृतीला साजेसे नाही. या गोष्टींमुळे संपूर्ण शहर काळजीत पडले आहे.