आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कारगिल विजय 21 वर्षे पूर्ण...:पतीचे शेवटचे पत्र उघडण्याचीही हिंमत झाली नाही... त्यांचे स्वप्न लक्षात राहिले; मुलगा त्याच युनिटमध्ये लेफ्टनंट झाला, तैनातीही त्याच भागात

जोधपूर / डी. डी. वैष्णव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहीद पित्याच्या पुतळ्यासोबत हितेश.
  • शहीद पतीच्या स्वप्नपूर्तीसाठी मुलाला लष्करात अधिकारी करणाऱ्या मातेची कहाणी...

कारगिलमध्ये तोलोलिंग टोकावरून शत्रूला हुसकावून लावल्यावर फडकावलेला तिरंगा आजही त्याच दिमाखात उभा आहे. या युद्धातील २ राजपूताना रायफल्सचे लान्स नायक बचन सिंह यांच्या बलिदानाला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, त्यांची पत्नी कमलेश बाला यांच्या डोळ्यात आजही ते क्षण तसेच जिवंत आहेत.पतीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण अन् अनेक वर्षांपासून त्यांच्या डोळ्यात पाहिलेले स्वप्न या महान पत्नीने पूर्ण केले. आज त्यांचा मुलगा लष्करात लेफ्टनंट झाला आहे. विशेष म्हणजे वडील ज्या बटालियनमध्ये शहीद झाले त्याच युनिटमध्ये मुलगा हितेश लेफ्टनंट आहे. पोस्टिंगही तेथेच आहे. कारगिल विजय दिनानिमित्त दैनिक भास्करने वीरांगना कमलेश बालांशी संवाद साधला. पतीच्या बलिदानानंतर मुलगा अधिकारी होईपर्यंतची कथा त्यांच्याच शब्दांत....

पतीचे शौर्य ऐकून पीएम, लष्करप्रमुखांचे डोळे पाणावले...हा परमवीर चक्रापेक्षा मोठा सन्मान
त्यांची आठवण आल्यावर आजही डोळे पाणावतात. त्यांना गमावल्याच्या दु:खामुळे नाही...तर मी त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले म्हणून. शिक्षण पूर्ण केले नाही म्हणून ते लष्करात शिपाई म्हणून दाखल झाले होते. यामुळे हितेश आणि हेमंत या जुळ्या मुलांनी लष्करात अधिकारी व्हावे अशी त्यांची इच्छा होती. पोस्टिंगदरम्यान लिहिलेल्या प्रत्येक पत्रात ते याचा आवर्जून उल्लेख करायचे. यूपीतील मुजफ्फरनगरमध्ये पचेंडा कला हे आमचे गाव. ते गावी यायचे तेव्हा कुटुंबासह गावात आनंदी वातावरण असायचे. ते दिलखुलास होते. त्यांच्या बलिदानाची बातमी आली तेव्हा संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. त्यांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी लिहिलेले शेवटचे पत्र कुटुंबाला मिळाले. मात्र, ते वाचण्याची कुणाचीही हिंमत झाली नाही. मी अजूनही ते जूपन ठेवले आहे. मुलांना लष्करात अधिकारी करायचे, एवढेच ध्येय माझ्यासमोर होते. वयाच्या ११ व्या वर्षी दोन्ही मुलांना मी सैनिकी शाळेत टाकले.

१२ वीनंतर पुढील शिक्षणासाठी दोघांना घेऊन दिल्लीत आले. इकडे हितेशने बीकॉम, तर हेमंतने बीएससी केले. हितेश सीडीएस उत्तीर्ण होऊन आयएम डेहराडूनमध्ये गेल्यावर माझे स्वप्न पूर्ण झाले. हेमंतलाही सैन्यात पाठवायचे होते. मात्र, कोरोनामुळे तो परीक्षा देऊ शकला नाही. वडील शिपाई असलेल्या बटालियनमध्येच मुलगा अधिकारी असल्याचा मला अभिमान आहे. डेहराडूनमध्ये पासिंग आऊट परेडमध्ये त्याला वर्दीमध्ये पाहिल्यावर माझे अश्रू थांबत नव्हते. २०१९ मध्ये कारगिल युद्धाला वीस वर्षे पूर्ण झाल्यामुळे आयोजित सोहळ्यात मला दिल्लीला बोलावले होते. व्यासपीठावर पतींची शौर्यगाथा सांगितली जात असताना माझ्या अश्रूंचा बांध फुटला होता. तेथे उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्करप्रमुख बिपिन रावत यांचेही डोळे पाणावले होते. हा सन्मान माझ्यासाठी परमवीर चक्रापेक्षा मोठा होता. आजही त्यांची पत्रे जपून ठेवली आहेत. याद्वारे मुलांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करते. माझा मुलगा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करत असल्याचा अभिमान वाटतो.