आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक विधानसभेत सोमवारी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे छायाचित्र लावण्यावरून मोठा वाद झाला. काँग्रेससह संपूर्ण विरोधकांनी या प्रकरणी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक आमदारांनी या प्रकरणी विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. त्यात सभागृहात वाल्मिकी, बसवण्णा, कनक दास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांचे छायाचित्र लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
दुसरीकडे, भाजपने या प्रकरणी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले - वैचारिक मतभेद असावेत. पण कोणत्याही गोष्टींना आंधळा विरोध असू नये. सावरकर एक स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या छायाचित्राला विरोध करण्याचे कोणतेच कारण नाही. सभागृहात त्यांचे छायाचित्र लावू नये तर मग दाऊद इब्राहिमचे लावावे काय?
काँग्रेस -विधानसभा अध्यक्षांचा निर्णय एकतर्फी
काँग्रेस नेते सिद्धरामय्या म्हणाले की, हा विरोध नाही. आमची केवळ सभागृहात सर्वच राष्ट्रीय नेते व समाज सुधारकांचे छायाचित्र लावण्याची मागणी आहे. विधानसभेच्या अध्यक्षांनी विधानसभेत वीर सावरकर यांचे छायाचित्र लावण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे.
सिद्धरामय्या म्हणाले - आमचा कुणाचेही छायाचित्र लावण्याला विरोध नाही. पण हे सर्वकाही करून सरकार कायदा व सुव्यवस्थेसारख्या ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष्य हटवण्याचा प्रयत्न करत आहे.
सरकारचा मुद्यावरून लक्ष्य हटवण्याचा प्रयत्न - काँग्रेस
कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व आमदार डी के शिवकुमार यांनी सरकावर अशा निर्णयांद्वारे विधानसभेच्या कामकाजात हेतुपुरस्सर अडथळे निर्माण करण्याचा आरोप केला. ते म्हणाले - विधानसभेचे कामकाज होऊ नये अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे ते कामकाजात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधक सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करणार असल्याची कुणकुण लागल्यामुळे त्यांनी सभागृहात हे छायाचित्र लावले. त्यांच्याकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही.
अधिवेशनात कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद गाजणार
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा सोमवारी पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी विरोधकांनी सभात्याग केला. कर्नाटक विधानसभेच्या 10 दिवसीय हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दाही उपस्थित होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रकरणी निदर्शने
बेळगाव पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारली. याविरोधात एकीकरण समिती व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी कोग्नोली टोल प्लाझाजवळ तीव्र निदर्शने केली. येथे कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यानंतरही जमाव निदर्शने करत आहे. येथे मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आलेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच या प्रकरणी राजकारण न करण्याचे आवाहन केले होते. सीमावादाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रथमच महाराष्ट्र-कर्नाटकात मध्यस्थी केली आहे. त्यामुळे या मुद्यावर यापुढे कुणीही राजकारण करू नये. आपल्याला सीमाभागातील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे लागेल, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.