आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:कर्नाटकच्या ‘नव्या भाजप’करिता अडचण होते येद्दी... म्हणूनच हटवले, नव्या मंत्रिमंडळात 2 नवे उपमुख्यमंत्री, 6 मंत्री वाढणार

बंगळुरू / विनय माधव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दक्षिणेत भाजपला पहिल्यांदा सत्ता मिळवून देणाऱ्या येद्दींची खुर्ची गेली

अखेर दक्षिणेतील भाजपचे सशक्त नेते ७८ वर्षीय बी. एस. येदियुरप्पांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. शेवटपर्यंत ते लिंगायत मठाधीशांसोबत बैठका घेत केंद्रीय नेतृत्वाला ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत राहिले. भाजपला २००८ मध्ये दक्षिणेकडील कोणत्याही राज्यात प्रथम सत्ता देणाऱ्या येदियुरप्पांनी दोन वर्षांपूर्वी ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी करत काँग्रेस-जेडीएस सरकार पाडून सत्ता मिळवली होती. इनाम म्हणून त्यांना एक वर्ष मुख्यमंत्री बनवले गेले. मात्र, राजकीय ताकदीवर ते आणखी एक वर्ष पदावर राहिले. कर्नाटकात नवी टीम तयार करण्याचे भाजपने ठरवले आहे. ६ नवीन नेते कॅबिनेटमध्ये येतील. २ उपमुख्यमंत्री बदलले जातील. येद्दींमुळे कॅबिनेटमध्ये नवी टीम बनवण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे लिंगायत समाज नाराज असतानाही त्यांना पद सोडण्यास सांगितले गेले.

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार; हे संघ व केंद्राचे निकटवर्तीय
मुरुगेश निराणी कॅबिनेटमध्ये सहभागी
येदियुरप्पांप्रमाणेच लिंगायत समुदायातील आहेत. येद्दींना हटवल्याने १७% व्होट बँक असलेला हा समुदाय नाराज आहे. त्यामुळे ते प्रबळ दावेदार. सोमवारी दिल्लीतच होते.

प्रल्हाद जोशी
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर स्वच्छ प्रतिमा. साधे राहणीमान. संघ परिवारात चांगली पकड आहे. त्यांचे समर्थक बंगळुरूमध्ये एकत्र येत आहेत.

बी. एल. संतोष
कर्नाटकमध्ये संघाचा प्रमुख चेहरा आहेत. तथापि, त्यांना संघटनेतून पक्षात आणण्याबाबत कर्नाटक संघ नेत्यांत सहमती व्हायची आहे. त्यांना विरोधही कमीच होतोय.

पुढील मुख्यमंत्र्याबाबत भाजप आणि संघ परिवाराने कोणतेच संकेत दिले नाहीत. भाजप सूत्रांच्या मते रा. स्व. संघाकडून भाजपची प्रतिमा बदलण्यासाठी नव्या चेहऱ्यालाही संधी दिली जाऊ शकते.

येद्दींसोबतच हे मंत्रीही हटवले जाऊ शकतात : भाजपने तरुणांना संधी देण्यासाठी ज्येष्ठ मंत्र्यांना हटवण्याची तयारीही केली आहे. पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा, उद्योगमंत्री जगदीश शेट्टार, गृहनिर्माणमंत्री व्ही. सोमन्ना व महसूलमंत्री आर. अशोक यांना हटवण्याबाबत सहमती झाली आहे.

दक्षिणेत आषाढात शुभकार्य होत नाहीत, सध्या येद्दीच अॅक्टिंग सीएम
येदियुरप्पा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अॅक्टिंग सीएम म्हणून कार्यरत राहतील. वास्तविक आषाढ महिन्यात दक्षिण भारतात सहसा शुभकार्य केले जात नाही. दुसरीकडे लिंगायत मठांच्या धर्माचार्यांनीही हा मुद्दा आता सोडून दिला आहे. मुरुगेश निराणी किंवा अरविंद बेलाडसारख्या लिंगायत नेत्याला सीएम बनवले जाऊ शकते, असे त्यांना सांगण्यात आले आहे.

अश्रू पुसत म्हणाले- दु:खी नाही, आनंदाने पद सोडत आहे.
दबावाखाली नाही, स्वेच्छेने पद सोडत आहे. परंतु कर्नाटक सोडणार नाही. राजकारणात सक्रिय राहीन. ७५ व्या वर्षी मला संधी दिल्याबद्दल पंतप्रधान, गृहमंत्री, भाजप अध्यक्षांचा आभारी आहे. ' - बी. एस. येदियुरप्पा

पहिला कार्यकाळ- ७ दिवस दुसरा- ३ वर्षे २ महिने., तिसरा-२ दिवस, चौथा- २ वर्षे
४ वेळा कर्नाटकचे सीएम राहिले, पण कार्यकाळ एकदाही पूर्ण करू शकले नाहीत. चारही कार्यकाळ मिळून केवळ सव्वापाच वर्षे राहिले खुर्चीवर!

बातम्या आणखी आहेत...