आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Elections Mallikarjun Kharge DK Shivakumar Rahul Gandhi, Sonia Gandhi Priyanka Gandhi, Siddaramaiah Get The Benefit Of Experience Or Will DK Reap The Rewards Of Penance? Right To CM Selection To Kharge

कर्नाटक:सिद्धरामय्या यांना अनुभवाचा लाभ मिळेल की डीकेंना तपस्येचे फळ? सीएम निवडीचे अधिकार खरगेंना

दिव्य मराठी नेटवर्क बंगळुरू, नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डीके म्हणाले, सिद्धरामय्यांशी मतभेद नाहीत, पक्षासाठी अनेकदा त्याग केला

कर्नाटकमध्ये बहुमत मिळवल्यानंतर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री निवडीच्या प्रक्रियेला वेग आल्याचे दिसते. पक्षाने सुशीलकुमार शिंदे, जितेंद्रसिंह व दीपक बाबरिया यांना निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. हे तिन्ही ज्येष्ठ नेते रविवारी सायंकाळी बंगळुरूत दाखल झाले. त्यानंतर विधिमंडळ पक्षाची बैठक एका खासगी हॉटेलमध्ये झाली. त्यात निवडीचे अधिकार खरगेंकडे सोपवण्यात आले. बैठकीपूर्वी वेणुगोपाल व निरीक्षकांनी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सिद्धरामय्या व डी.के. शिवकुमार यांच्यासोबत बैठक घेतली. रात्री उशिरा निरीक्षकांनी आमदारांशीही सल्लामसलत केली. आता सोमवारी निवडणूक प्रभारी रणदीप सुरजेवाला यांच्यासह कर्नाटकचे सर्व वरिष्ठ नेते दिल्लीला पोहोचणार आहेत.

त्यानंतर खरगे यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. सिद्धरामय्या २०१३ ते २०१८ पर्यंत मुख्यमंत्रिपदावर राहिले आहेत. डी.के. शिवकुमार मात्र संधी मिळाल्यास पहिल्यांदाच सीएम होतील. त्याबाबत डीके रविवारी म्हणाले, सिद्धरामय्यांशी माझे काही मुद्द्यांवरून मतभेद असल्याचे काही लोक सांगतात. परंतु त्यांच्याशी माझे कसलेही मतभेद नाहीत. पक्षासाठी मी अनेक वेळा त्याग केला आहे. मी नेहमीच सिद्धरामय्यांना सहकार्य केले आहे. त्यातच काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी रविवारी विरोधी पक्षांना एकजुटीचे आवाहन केले. विरोधी पक्ष एकत्र आले नाही तर देशातील जनता माफ करणार नाही. विरोधकांची एकजूट झाल्यास भाजप सत्तेवर राहणार नाही, असे ते म्हणाले.

काँग्रेसने कंबर कसली
रणनीतिकारांना आता लोकसभा, मप्रचीही जबाबदारी
मुकेश कौशिक . नवी दिल्ली

कर्नाटकात काँग्रेसच्या विजयात स्ट्रॅटेजी मशिनरीची महत्त्वाची भूमिका राहिली. आता याच टीमवर मिशन २०२४ ची जबाबदारी सोपवली जाणार आहे. प्रशांत किशोरांच्या टीमशी जोडलेले निवडणूक सल्लागार सुनील कानुगोलू (माइंड शेअर अॅनालिटिक्स), कर्नाटकात काँग्रेसच्या वॉररूमचे प्रभारी शशिकांत सेंथिल, डिझाइन बॉक्स्डचे नरेश अरोरा आता दिल्लीला रवाना होतील. सोबत पोलमिट्रिक्सचे विनायक दत्तही असतील. त्यांची ३०० सदस्यांची टीमही सोबत असेल. सूत्रांच्या म्हणण्यानुसार हे रणनीतिकार मिशन २०१४ च्या आधी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणामध्येही तळ ठोकतील. त्यापैकी दोन राज्यांत काँग्रेस सत्तेची दावेदार आहे. एका राज्यात सत्ता वाचवणे आणि तेलंगणात तिरंगी लढतीत केसीआर व भाजपचा रथ रोखण्याचे आव्हान असेल.

मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवण्यासाठी सुशीलकुमार शिंदेंना तातडीने पाचारण
सोलापूर | कर्नाटकातील मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसने पक्षनिरीक्षकपदी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचीही निवड केली असून दिल्लीहून पक्षश्रेष्ठींनी त्यांना बंगळुरू येथे पाचारण केले अाहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र विमान सोलापूरला पाठवण्यात आले होते. नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होईपर्यंत शिंदे हे बंगळुरूमध्ये असणार आहेत.

दोन्ही नेते ४० वर्षांपासून राजकारणात
डी.के. शिवकुमार

वोक्कालिगा समुदायाचे मुरब्बी नेते. १९८९पासून सलग विजय. यंदा जेडीएस आमदाराला १ लाखांहून जास्त मतांनी पराभूत करून ८ व्यांदा विजयी. कर्नाटक काँग्रेसचे सर्वात श्रीमंत नेते. निवडणुकीपूर्वी १०४ दिवस तुरुंगात राहिले.
---
सिद्धरामय्या
मागास वर्गातील नेते. कुरुबा समुदायाशी संबंध. १९८३ मध्ये पहिल्यांदा अपक्ष आमदार. १९९४ मध्ये जनता दलातून उपमुख्यमंत्री झाले. २००८ मध्ये काँग्रेसमध्ये गेले. २०१३-१८ पर्यंत मुख्यमंत्री. १२ निवडणुका लढले. ९ जिंकले.