आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्लेषण:कर्नाटक निवडणुकीचा उद्या फैसला; BJP चा पराभव झाला तर 2024 मध्ये अडचणींचा डोंगर, जाणून घ्या कसे होणार नुकसान

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच कर्नाटकात असा रोड शो केला होता. - Divya Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच कर्नाटकात असा रोड शो केला होता.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी घोषित होईल. एक्झिट पोल्सच्या अंदाजांमुळे सत्ताधारी भाजपची धाकधूक वाढली आहे. बहुतांश पोल्समध्ये भाजपचा पराभव, तर काँग्रेसच्या विजयाचे भाकित वर्तवण्यात आले आहे. इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, काँग्रेसला सर्वाधिक 122 ते 140, तर भाजपला 62 ते 80 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच जेडीएसला 20 ते 25, तर इतरांना 0 ते 3 जागा मिळण्याचा अंदाजही यात वर्तवण्यात आला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक ही काही सामान्य निवडणूक नाही. या निवडणुकीचे राजकीय महत्त्व कर्नाटकच्या राजकारणापुरते मर्यादित नसून 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही ते महत्त्वाचे मानले जात आहे. कर्नाटकच्या निवडणूक निकालांचा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीशी संबंध जोडला जात आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या दृष्टिकोनातूनही कर्नाटकची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची ठरते. एक्झिट पोलचे अंदाज निकालात बदलले, तर भाजप सत्तेतून बाहेर पडेल. कर्नाटक निवडणुकीत भाजपचा पराभव झाला, तर केंद्रातील या सत्ताधारी पक्षाला 2024 च्या निवडणुकीसाठी ठेवलेले आपले लक्ष्य गाठणे अवघडच नव्हे तर अशक्य होईल, असे बोलले जात आहे.

2024 मध्ये भाजपपुढे कोणत्या अडचणी?

कर्नाटकातील जागांत घट होणार

विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला, तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या कर्नाटकातील जागांत मोठी घट होण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील 28 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या. तसेच भाजप पुरस्कृत 1 अपक्षही जिंकला होता. याऊलट काँग्रेस-जेडीएसला प्रत्येकी 1 जागा मिळाली होती. आता कर्नाटकात भाजपचा पराभव झाल्यास राज्यात 2019 च्या निकालाची पुनरावृत्ती करणे पक्षाला कठीण होईल. तसेच काँग्रेस सत्तेत आल्यास पक्षाची डोकेदुखीही वाढेल.

भाजपला याची भरपाई करता येईल का?

कर्नाटकाबरोबरच पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, महाराष्ट्रातही भाजपच्या जागांत घट होऊ शकते. या राज्यांतील जागांचा तोटा भरून काढण्यासाठी भाजपला नवीन राज्ये शोधावी लागतील. ते तूर्त तरी शक्य दिसत नाही.

5 राज्यांत 172 जागा

उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बंगालमधील 42 पैकी 18, महाराष्ट्रातील 48 पैकी 23, कर्नाटकच्या 28 पैकी 25, बिहारच्या 40 पैकी 17, झारखंडच्या 14 पैकी 12 जागा जिंकल्या होत्या. या 5 राज्यांतील 172 पैकी भाजपने स्वबळावर 98 जागा जिंकल्या होत्या. तर त्यांच्या मित्रपक्षांना 42 जागा जिंकण्यात यश मिळाले होते. अशा प्रकारे भाजप आघाडीने 172 पैकी 140 जागा आपल्या खिशात घातल्या होत्या.

भाजपचे समीकरण बिघडले

महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. 2019 मध्ये भाजपसोबत युती करून निवडणूक लढवणारी शिवसेना आता काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीमध्ये आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना हाताशी धरले. पण 'मूड ऑफ नेशन'च्या सर्वेक्षणात महाविकास आघाडीला 48 पैकी 34 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, बिहारमध्ये नितीश कुमार महाआघाडीत परतलेत. त्यामुळे बिहारमध्येही भाजपचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यामुळे भाजपचे समीकरण बिघडले आहे. त्यांचे सर्व नेते टीएमसीमध्ये प्रवेश करत आहेत.

भाजपच्या मिशन-दक्षिणेला झटका

भाजपला दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू व तेलंगणात अद्याप स्वतःचे वर्चस्व सिद्ध करता आले नाही. दक्षिणेतील 6 राज्यांमध्ये लोकसभेच्या 130 जागा आहेत. त्यांचे प्रमाण लोकसभेच्या एकूम जागांच्या तुलनेत 25 टक्के आहे. त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून दक्षिणही अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्नाटकच्या माध्यमातून भाजपची दक्षिणेत पाय पसरण्याची इच्छा होती. पण कर्नाटकातच त्यांना जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. असे झाले तर त्याचा मोठा राजकीय फटका भाजपला तेलंगणा व आंध्र प्रदेशसह दक्षिणेतील इतर राज्यांमध्येही सहन करावा लागू शकतो.

अखिल भारतीय पक्षाच्या प्रतिमेला धक्का

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला, तर दक्षिण भारतातून त्याच्या परतीचा प्रवास सुरू होईल. विशेषतः अखिल भारतीय पक्ष असल्याचा त्याच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. भाजपला दक्षिणेतील राज्यांपैकी केवळ कर्नाटकातच स्वबळावर आपली मुळे रोवता आली आहेत. कर्नाटक वगळता त्या भागातील इतर कोणत्याही राज्यात भाजपचा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे कर्नाटक गमावणे भाजपसाठी फार मोठे नुकसान ठरणार आहे.