आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेशातील प्रसिद्ध काशी विश्वनाथ धामचा चेहरा बदलला आहे. आता गंगाकाठावरून वाराणसीच्या जुन्या घाटांतून थेट बाबा विश्वनाथांपर्यंत पोहोचता येईल. विशेष म्हणजे नवनिर्मित काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या माध्यमातून श्रीकाशी विश्वनाथ मंदिर आणि आई गंगा थेट जोडली गेली आहे. नावेद्वारे गेल्यास आता नौकाविहाराच्या आनंदासह गंगा घाटाचाही आनंद लुटत बाबांच्या धामापर्यंत पोहोचता येईल. शिवाय काशी विश्वनाथ धाममध्ये असे दार आहे जे रस्ता आणि इतर मार्गांना विश्वनाथ धामशी जोडले जाते. जर भाविक बनारसचे दक्षिण टोक अस्सी घाटावर असेल तर त्याला नावेने प्रवास करून जेमतेम १५ मिनिटांत उत्तर टोक खिरकिया घाट किंवा राजघाटाहून केवळ १० मिनिटांत नौकानयनाने बाबाधाम पोहोचतील. यामुळे नाविकांची मिळकत वाढण्यासही मदत होईल. बनारसमध्ये राहणारे विजय यादव म्हणाले की, ‘मी स्वप्नातही विचार केला नव्हता की नावेने बाबाधामपर्यंत पोहोचू शकेन. हॉटेल साहूचे मालक अॅड. आशिष साहू म्हणाले, भाविक आता गल्लीबोळांऐवजी गंगेतून नावेने येऊ पाहतील.
श्रावणात कावडधारींना मिळेल दिलासा : काशी विश्वनाथ गंगेशी जोडले गेल्याने शिवभक्तांसाठी ही एक मोठी पर्वणीच ठरणार आहे. विशेषत: कावडधारींसाठी. काशी विश्वनाथ धाम ज्योतिर्लिंगही आहे. श्रावणात काशी विश्वनाथ धाम दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने कावडधारी पोहोचतात. आता श्रावणात शहरात येणारी गर्दी कमी होईल. तर दररोज काशी विश्वनाथ धाममध्ये येणाऱ्या २० ते २५ हजार भाविकांची गर्दीही सामावली जाईल.
व्यवसाय: अनेक पटींनी तेजी येण्याची आशा, नाविकांचे जीवन बदलणार
गंगा नदीचा मार्ग सुरू झाल्याने वाराणसीतील व्यवसायात मोठी उसळी येण्याची आशा आहे. जलमार्ग नाविकांचे उत्पन्न वाढवण्यातही सहायक ठरेल. तर भक्तांची संख्या वाढल्यास हॉटेल, रेस्टॉरंटसह खरेदीशी निगडित सर्व व्यापारही अनेक पटींनी वाढण्याची शक्यता आहे.
भाविक : काशीत स्थानिक धार्मिक पर्यटन तीन ते चार पटींनी वाढणार
वाराणसी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गोकुळ शर्मा म्हणाले की, कॉरिडॉर काशीच्या पर्यटन व्यवसायासाठी नवसंजीवनी ठरणार आहे. कोरोनाचा संसर्ग असतानाही देशी पर्यटकांमुळे सुमारे १००० हॉटेल्स, लॉज आदी फेब्रुवारीपर्यंत पूर्णपणे बुक आहेत. वाराणसी व्यापार मंडळाचे पदाधिकारी गुलशन कपूर म्हणाले की, विश्वनाथ कॉरिडॉर बनल्याने प. बंगाल व दक्षिण भारतातून येणाऱ्यांची संख्या तीन ते चार पटींनी वाढेल.
हे बदल केले : आधी ३००० चौरस फूट होता परिसर, तो १८३ पटींनी वाढला, या परिसरात २३ इमारती आणि २७ मंदिरे
विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये लहानमोठ्या २३ इमारती आणि २७ मंदिरे आहेत. हा पूर्ण कॉरिडॉर ५ लाख ५० हजार चौरस फुटांच्या मोठ्या परिसरात बनवला गेला. आधी याचा आकार सुमारे ३००० चौरस फूट होता. नवा कॉरिडॉर ३ भागांत विभागला गेला. यात ४ मोठी दारे आणि प्रदक्षिणा मार्गावर संगमरवरचे २२ शिलालेख लावले गेले. यावर काशीच्या महिम्याचे वर्णन आहे. याशिवाय या कॉरिडॉरमध्ये मंदिर चौक, मुमुक्षू भवन, तीन प्रवासी सुविधा केंद्र, चार शॉपिंग कॉम्प्लेक्स, मल्टिपर्पज हॉल, सिटी म्युझियम , वाराणसी गॅलरी अशा सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली. जर गोदौलियाकडील दाराने कोणी प्रवेश केला तर तो युटिलिटी भवन, सिक्युरिटी ऑफिसला येईल.हा कॉरिडॉर झाल्यानंतर भाविक आता ५० फुटी रस्त्याने बाबांचे दर्शन करू शकतील.
उपलब्धी : महात्मा गांधींचे स्वच्छ मंदिराचे स्वप्न झाले साकार
काशी विद्वत परिषदेचे अध्यक्ष प्रो. रामनारायण द्विवेदी म्हणाले की, १९०३ मध्ये महात्मा गांधी पहिल्यांदा वाराणसीला आले होते. ते जेव्हा मंदिरात दर्शनासाठी गेले तेव्हा त्यांनी लिहिले की, ‘ज्या ठिकाणी लोक ध्यानधारणा आणि शांततेची अपेक्षा करतात ती येथे अजिबातच नाही. येथे घाण आहे.’ प्रो. द्विवेदींनी म्हटले की, आज रूप बदलले आहे. वाराणसी स्वच्छ झाले असून गांधीजी असते तर ते खूपच आनंदी झाले असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.