आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनगर:काश्मिरी पंडिताची मेडिकल दुकानात घुसून निर्घृण हत्या, काश्मीरमध्ये दीड तासात 3 दहशतवादी हल्ले

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत असताना दहशतवाद्यांनी सामान्य लोकांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी तीन वेगवेगळ्या घटनांत दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये प्रतिष्ठित केमिस्ट माखनलाल बिंद्रू यांची दुकानात घुसून हत्या केली. तर, लाल बाझार भागात बिहारच्या एका व्यक्तीस गोळ्या घातल्या. तिसरा हल्ला बांदीपोरामध्ये झाला. यात टॅक्सी युनियनच्या अध्यक्षास ठार मारण्यात आले. या हल्ल्यांनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू केला असून बाहेरच्या लोकांनी काश्मीरमध्ये स्थानिक लोकांचा रोजगार हिरावू घेऊ नये, असा इशारा दहशतवाद्यांनी दिला आहे.

६८ वर्षीय बिंद्रू यांनी १९९०च्या भयंकर काळातही काश्मीर सोडले नव्हते. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या हत्येबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून दोषींना कठोर शासन केले जाईल, असे सांगितले. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांनीही या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध केला.

पाणीपुरीवाला, टॅक्सी युनियनच्या अध्यक्षाचीही हत्या
बिंद्रू यांच्यावर हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी अवंतीपोरामध्ये बिहारच्या वीरेंद्र पासवान याला ठार मारले. वीरेंद्र भेळपुरी आणि पाणीपुरीचा गाडा चालवत असे. त्यांनाही गाड्याजवळच मारण्यात आले. यानंतर काही मिनिटांनी स्थानिक टॅक्सी युनियनचे अध्यक्ष मोहंमद शफी यांची ते पायी टॅक्सी स्टँडकडे जात असताना दहशतवाद्यांनी हत्या केली.

...दुकान बंद होऊ दिले नाही
बिंद्रू श्रीनगर भागातील प्रमुख केमिस्ट होते. त्यांच्या तीन पिढ्या या व्यवसायात आहेत. १९९० मध्ये दहशतवाद पेटलेला असतानाही ते तेथेच कायम राहिले. मुस्लिम समाजाशी त्यांचे संबंध इतके जिव्हाळ्याचे होते की एक दिवसही त्यांना दुकान बंद ठेवावे लागले नाही. जे औषध कुठेच मिळत नव्हते ते त्यांच्या दुकानात मिळत असे. त्यांच्या दुकानात नेहमी गर्दी असे. अर्धा-अर्धा तास लोक दुकानावर औषधांसाठी रांग लावून उभे असत. काश्मीरमधील होलसेलरपेक्षा अधिक औषधे बिंद्रू रिटेलमध्ये विकत असत. बिंद्रू यांची ओळख असलेले बशारत अहमद सांगतात, आज काश्मीरने खरा सुपुत्र गमावला आहे. त्यांचे कुटुंब कित्येक पिढ्यांपासून लोकांना औषधांचा पुरवठा करत आहे. श्रीनगरचे दानिश म्हणाले, चांगली औषधे फक्त बिंद्रूच्या दुकानातच मिळतात, असे माझी आई नेहमी सांगत असे.

बातम्या आणखी आहेत...