आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोहिणी हट्टंगडी यांना ‘गांधी’ या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. कस्तुरबा साकारताना त्यांना अनेक अनुभव आले. योगायोगाने कस्तुरबा गांधी आणि रोहिणी हट्टंगडी यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजेच ११ एप्रिलचा. कस्तुरबा रोलच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात कसे बदल झाले, कस्तुरबा साकारताना त्या हा रोल कशा जगल्या या आठवणी त्यांच्याच शब्दांत….
आपल्या कला कारकीर्दीत सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या कलावंतांसह कामाची संधी मिळणे, ती विशिष्ट भूमिका आपल्या देशाच्या नजीकच्या इतिहासातील आदरार्ह व्यक्ती असणे, त्या भूमिकेचे शिवधनुष्य पेलता येणे... हे सारे विलक्षणच होते. रंगभूमीवर तोवर स्थिरावलेल्या माझ्यातील अभिनेत्रीला ‘गांधी’ या चित्रपटातील कस्तुरबांची भूमिका अनेक अर्थांनी समृद्ध करणारी ठरली. कस्तुरबांच्या या भूमिकेने मला आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक, सन्मान, यश, प्रसिद्धी आणि कीर्ती मिळवून दिली हे मान्य आहेच. त्याविषयी मनात कृतज्ञताच आहे, मात्र, ऐन तरुण वयात ही भूमिका साकारल्याने मी त्याच प्रकारच्या ‘इमेज’मध्ये कैद झाले आणि प्रयत्न करूनही मला ती इमेज तोडता आली नाही हीदेखील वस्तुस्थिती आहे. त्यानंतर मला नेहमी वयस्कर पद्धतीच्या भूमिका मिळत गेल्या आणि माझी चित्रपटीय कला कारकीर्द प्रामुख्याने चरित्र भूमिकांमध्ये फिरत राहिली. अर्थात, मी प्रत्येक भूमिका माझ्या परीने उत्तम साकारण्याचा प्रयत्न केला.
आमचा वाढदिवस एकाच दिवशी
माझा वाढदिवस अकरा एप्रिलला असतो. गंमत म्हणजे ज्या भूमिकेमुळे मला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवून दिली, त्या आदरणीय कस्तुरबांची जन्मतारीखही ११ एप्रिल हीच आहे. चित्रपटासाठी चरित्रसाधनांचा अभ्यास करताना नंतर ही गोष्ट लक्षात आली आणि या समान जन्मतारखांच्या योगायोगाची गंमत वाटली. त्यामुळे वयाच्या सत्तरीच्या उंबरठ्यावर मनात खंत वा नाराजी नाही, पण ‘इमेज ट्रॅप’ होण्यापासून कलाकारांनी जपले पाहिजे, असे नक्की सांगावेसे वाटते. मी मूळची राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची (एनएसडी) विद्यार्थिनी. त्यामुळे ओढा रंगभूमीकडेच होता आणि आहे. पण व्यावसायिक कलाकार म्हणून वावरताना मिळालेली ही भूमिका मला ‘प्रतिमाकैद ‘ करणारी ठरेल, याची ती साकारताना कल्पना नव्हती.
अगदी तरुण वयात असतानाही वयस्कर कस्तुरबांची भूमिका मी एक आव्हान म्हणूनच स्वीकारली. पण त्यानंतरच्या काळात मला मिळालेल्या अधिकतर भूमिका वयस्कर स्वरूपाच्या होत्या आणि मला त्या स्वीकाराव्या लागल्या. आणखी एक मुद्दा असा, की याच काळात (१९८५ च्या आसपास) हिंदी चित्रपटातील चरित्र स्त्री भूमिका करणाऱ्या अभिनेत्री रिटायर झाल्या होत्या आणि तो स्लाॅट मला मिळाला. अर्थात चित्रपटात चरित्र भूमिकांमध्ये वावरत असले तरी रंगभूमीवर मात्र मनासारखे काम करता आले, याचे समाधान आहे. मराठीप्रमाणे मी गुजराती रंगभूमीवर बरेच प्रयोग केले. जपानी कलाकारांसह ‘काबुची’ केले. कन्नडमध्ये ‘यक्षगान’ केले. रंगभूमीवर मनासारखे काम करतानाच छोट्या पडद्यावरही भरपूर काम केले. जाहिराती केल्या. विविध माध्यमांतून सातत्याने काम करत असल्याने कलाकार म्हणून आपल्या जाणिवा विकसित होत जातात, अधिक सफाई येते, अनुभवांची समृद्धी प्रगल्भ बनवते. शिकण्याची प्रक्रिया सुरू राहते. मी याचा प्रत्यय घेत आहे आणि माझ्या आजवरच्या कला कारकीर्दीविषयी समाधानी आहे.
शब्दांकन: जयश्री बोकील
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.