आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा22 फेब्रुवारी 2018 रोजी केरळच्या पलक्कडलगतच्या अट्टापडीमध्ये एका जमावाने तांदूळ चोरल्याप्रकरणी एका आदिवासी तरुणाला पकडले. मधू नामक या 27 वर्षीय तरुणाला त्यांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. पण तिथे त्याचा मृत्यू झाला.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केरळ पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले. यापैकी 14 आरोपींना बुधवारी मनारक्कडच्या विशेष न्यायालयाने दोषी घोषित केले आहे. तर दोघांची निर्दोष सुटका केली आहे. सर्वच दोषींना 5 एप्रिल रोजी शिक्षा ठोठावण्यात येईल.
या प्रकरणाची सुनावणी मधूच्या मृत्यूनंतर 4 वर्षांनी म्हणजे जून 2022 मध्ये सुरू झाली होती. जवळपास 122 जण आरोपी होते. पण मध्येच 2 वकिलांनी राजीनामे दिल्यामुळे हा खटला लांबला.
आरोपींची सेल्फीच बनली पुरावा
मन्नारक्कड कोर्टाने या प्रकरणी पुरावा म्हणून आरोपींच्या सेल्फीची निवड केली. कोर्टाने हुसैन, मरक्कर, शमसुद्दीन, अबूबकर, सिद्दीकी, उबैद, नजीब, जैजुमन, सजिश, सतीश, संजीव, हरिश, बीजू व मुनीरला दोषी घोषित केले. तर अनिश व अब्दुल करीमची निर्दोष सुटका केली.
केरळ हायकोर्टाने यापूर्वी आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला होता. पण, स्पेशल कोर्टाने आरोपींच्या इशाऱ्यानुसार अनेक साक्षीदारांनी आपला जबाब फिरवल्याचे नमूद करत हा जामीन रद्द केला होता. त्यानंतर हायकोर्टानेही 2022 मध्ये स्पेशल कोर्टाच्या या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते.
आता जाणून घ्या काय होते 5 वर्षे जुने प्रकरण
प्रकरण केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील आहे. येथील काही लोकांनी 27 वर्षीय आदिवासी तरुण मधूला जंगलातून पकडून आणले होते. त्यांनी त्याचे हात-पाय बांधले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. घटनास्थळी काहीजण सेल्फी घेतानाही दिसून आले. त्यानंतर अर्धमेल्या स्थितीत त्याला पोलिस ठाण्यात नेऊन टाकले. पोलिसांनी मधूला रुग्णालयात नेले. पण तो वाचला नाही. यासंबंधीच्या वृत्तानुसार, मधू मानसिकदृष्ट्या आजारी होता. तो कधीकधी जंगलातून शहरातही येत होता.
मधूची स्थिती पाहून तो अनेक दिवसांपासून उपाशी असल्याचे वाटत होते. यामुळेच तो पोटआग शमवण्यासाठी जंगलातून शहराच्या दिशेने आला होता. भूकेमुळे त्याने तांदूळ व काही जेवणाचे सामान चोरले. मधूचा चिंदक्की आदिवासी वसतीशी संबंध होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.