आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर फेसबूक पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी नवी मुंबईतील कळंबोली येथून आज सायंकाळी ताब्यात घेतले. त्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे.
पोलिस ठाण्यातून केतकीला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेताना तिच्यावर राष्ट्रवादी महिला सेलच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली तसेच तिच्या अंगावर अंडीही फेकण्यात आली. तिच्या विरोधात हाय-हाय अशा घोषणाही यावेळी राष्ट्रवादी महिला सेलच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.
शरद पवार यांच्यावर पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला आहे. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली असून आक्षेपार्ह पोस्टचे प्रकरण तिच्या चांगलेच अंगलट आले आहे.
शरद पवारांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर केतकी चितळेवर राज ठाकरेंपासून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी तिच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता पोलिसांनीही तिला ताब्यात घेतले आहे.
आव्हाडांनी ट्विट करुन मानले पोलिसांचे आभार
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करीत नवी मुंबई आणि ठाणे पोलिसांचे आभार मानले आहेत. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर केतकी चितळे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर त्यांनी पोलिसांचे आभार मानले.
फेसबूकवर अजूनही वादग्रस्त पोस्ट
केतकी चितळे हिच्या वादग्रस्त पोस्टनंतर गुन्हा नोंद झाला आणि पोलिसांनी तिला ताब्यातही घेतले पण हे सर्व 'महाभारत' घडत असतानाच तिची आक्षेपार्ह पोस्ट अजूनही फेसबूकवर आहे. शनिवारी सायंकाळपर्यंतही ती पोस्ट तिच्या वाॅलवर होती.
नरकात जाण्याची वापरली भाषा
अभिनेत्री केतकी चितळेने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी अत्यंत वाईट भाषेत टीका केली. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट आहे असे तीने या पोस्टमध्ये लिहिले आहे. पण याच पोस्टमध्ये शरद पवारांबाबत नरकाची भाषा केले गेली आहे. या प्रकरणी मुंबईतील कळवा पोलिस स्टेशनमध्ये 153 आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याने केतकीच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून आता पोलिसांनीही तिला ताब्यात घेतले आहे.
महिला आयोगाकडूनही कारवाईची शक्यता
अभिनेत्री केतकी चितळे हिने केलेल्या पोस्टसंदर्भात तिच्याविरुद्ध पुण्यातही तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणात तिच्याविरुद्ध गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. आता तिच्या या कृत्याप्रकरणी महिला आयोगाकडूनही कारवाई होणार असल्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली.
केतकी चितळेवर कारवाई होणारच-गृहमंत्री
केतकी चितळे हिने शरद पवारांविरुद्ध केलेली पोस्ट ही जाणीवपुर्वक केलेली आहे, त्यामुळे केतकीवर कारवाई होणारच अशी स्पष्टोक्तीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. दरम्यान केतकी चितळेविरोधात औरंगाबादेतही आंदोलन करण्यात आले आहे.
आम्ही हे सातत्याने अपडेट करत आहोत...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.