आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधमाशांपासून वाचण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून उडी:खंडवा जिल्हा रुग्णालयात तरुणाचा मृत्यू; मृताच्या पत्नीची रात्रीच झाली होती प्रसूती

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मधमाशांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी रुग्णालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारणाऱ्या एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातून समोर आली आहे. राज्यातील खंडवा जिल्हा रुग्णालयात ही घटना घडली आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, रामपुरा गावात राहणारा सचिन सोळंकी हा त्याची पत्नी छायाबाईला प्रसूतीसाठी रुग्णालयात घेऊन आला होता. रविवारी सायंकाळी छायाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. यानंतर रात्रीच्या वेळी पत्नीसोबत असलेला सचिन हा प्रसूती वॉर्डाबाहेरील व्हरांड्यातच झोपला. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या प्रसूती वॉर्डाच्या छताला मधमाशांचे पोळेही लटकलेले होते.

सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास या पोळ्यातून अचानकपणे मधमाशा बाहेर पडल्या आणि त्यांनी व्हरांड्यात झोपलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांवर हल्ला केला. यावेळी मधमाशांपासून बचावासाठी लोक इकडे-तिकडे पळायला लागले. यादरम्यान सचिनही व्हरांड्यातून गॅलरीच्या दिशेने पळाला आणि मधमाशांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी त्याने थेट तिसऱ्या मजल्यावरूनच उडी मारली. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. ओपी जुगतावत यांनी मधमाशांच्या हल्ल्याची गोष्ट फेटाळत सचिनने आत्महत्या केल्याचा दावा केला. रात्री उशीरा या कुटुंबीयांत वाद झाला होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दोन-तीन वेळा भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. पहाटेच्या सुमारास सचिनने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याचा दावा जुगतावत यांनी केला आहे.

सीएमएचओंचे तपासाचे निर्देश

सीएमएचओ डॉ. शरद हरणेंनी या प्रकरणी तपासाचे निर्देश दिले आहेत. रुग्णालय व्यवस्थापनाला मधमाशांचे पोळे तत्काळ हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर जयसचे जिल्हाध्यक्ष पीयूष मुझाल्देंनी कुटुंबीयांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली आहे. मधमाशांच्या हल्ल्यामुळे सचिनचा मृत्यू झाल्याचे ते म्हणाले.