आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kharge Was A Football kabaddi Star In School, Completed His Education By Working In A Cinema

चर्चेतील व्यक्तिमत्त्व - मल्लिकार्जुन खरगे:शाळेत फुटबॉल-कबड्डीचे स्टार होते खरगे, सिनेमागृहात नोकरी करून पूर्ण केले शिक्षण

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जन्म - २१ जुलै १९४२, कर्नाटक शिक्षण - गुलबर्गा कॉलेजमधून पदवी. सेठ शंकरलाल लाहोटी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी. कुटुंब - दलित कुटुंबात जन्म. सात वर्षांचे असताना आईचे निधन. पत्नी राधाबाई, पाच अपत्ये (२ मुली आणि ३ मुले) आहेत. मालमत्ता ः सुमारे १५ कोटी रु. विविध मीडिया रिपोर्ट््सनुसार

मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. ८० वर्षीय खरगे गांधी घराण्याशी निष्ठावंत नेते मानले जातात. कर्नाटकातील दलित कुटुंबात जन्मलेले खरगे गेली ५० वर्षे काँग्रेसचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी १२ निवडणुका (९ विधानसभा, ३ लोकसभा) लढवल्या, त्यापैकी सलग ११ निवडणुका जिंकल्या. २०१९ च्या शेवटच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ४४ जागांवर सीमित झाली, तेव्हा पक्षश्रेष्ठींनी त्यांची लोकसभेतील काँग्रेस नेतेपदी निवड केली. नंतर खरगेंनी भाजपला कौरव सेना म्हटले, त्यावरून बराच वाद झाला होता. आता पक्षाध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये वाद व संकट निर्माण झाल्याने खरगेंना पुन्हा पुढे आणण्यात आले. गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर खरगेंना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते करण्यात आले. मात्र, या निष्ठावान नेत्याला कधीच मुख्यमंत्रिपद मिळाले नाही. त्यांनी तीनदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर दावा केला, पण यश आले नाही. खरगे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले तर या पदावर पोहोचणारे ते बाबू जगजीवन राम यांच्यानंतर दुसरे दलित नेते असतील.

कुटुंब : दंगलीमुळे शहर सोडले, मुलगा प्रियांक २ वेळा मंत्री मल्लिकार्जुन खरगे यांचा जन्म कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील वरवट्टी गावात झाला. सात वर्षांचे असताना त्यांनी दंगलीत आई आणि कुटुंबीय गमावले. त्यामुळे त्यांचे कुटुंब घर सोडून शेजारच्या गुलबर्गा जिल्ह्यात स्थायिक झाले. खरगे यांचा राधाबाईंशी १९७२ मध्ये विवाह झाला. खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगेदेखील राजकारणात सक्रिय असून ते काँग्रेसचे नेते आहेत. सध्या प्रियांक कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत आणि दोन वेळा मंत्रीही होते.

शिक्षण ः शाळेत स्टार खेळाडू, कायद्याचा अभ्यास करत राजकारण प्रवेश खरगे यांचे शालेय शिक्षण गुलबर्गा येथील नूतन विद्यालयात झाले. अभ्यासात ते सरासरी होते, पण खेळात शालेय संघाचे स्टार होते. फुटबॉल, हॉकी व कबड्डी यांसारख्या खेळांमध्ये ते प्रवीण होते आणि त्यांनी जिल्हा व विभाग स्तरावर शाळेचे प्रतिनिधित्व केले. कबड्डी संघात त्यांची भूमिका रेडर (हल्ला करणारा खेळाडू) अशी होती. शिक्षणादरम्यान खर्च भागवण्यासाठी खरगे सिनेमागृहात कामही करायचे. महाविद्यालयीन जीवनापासूनच खरगे राजकारणात सक्रिय होते. गुलबर्ग्याच्या शासकीय महाविद्यालयात त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक जिंकली. विद्यार्थी संसदेचे सरचिटणीसपद त्यांनी मिळवले होते. कायद्याची पदवी घेतल्यावर त्यांनी न्यायमूर्ती शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली वकिलीही सुरू ठेवली. कामगारांशी संबंधित अनेक प्रकरणांत त्यांनी वकिली केली.

राजकीय : ११ निवडणुका जिंकल्या, २०१९ मध्ये पहिला पराभव खरगे यांनी १९७२ मध्ये गुरमितकल मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. २००९ पर्यंत प्रत्येक विधानसभा निवडणूक जिंकली. २००९ मध्ये लोकसभा लढवून विधानसभेची जागा सोडली व पहिल्यांदा खासदार झाले. २०१४ मध्ये पुन्हा खासदार झाले. ४७ वर्षे कधीही हरले नाहीत. २०१९ मध्ये पहिल्यांदा पराभव झाला. गुलबर्गा मतदारसंघातून त्यांचा भाजपच्या उमेश जाधव यांच्याकडून पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसने खरगे यांना राज्यसभेची जागा दिली आणि ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेही झाले.

तथ्य : मुलांची नावे नेहरू-गांधी कुटुंबावरून असल्याचे मानले जाते - त्यांच्या मुलांची नावे नेहरू-गांधी घराण्यावरून असल्याचे सांगितले जाते. उदा. राहुल व प्रियांक अशी मुलांची नावे, तर मुलीचे नाव प्रियदर्शिनी आहे. - २००६ मध्ये खरगे यांनी सांगितले की, मी बौद्ध धर्म मानतो व डाॅ. आंबेडकरांच्या आदर्शांचे पालन करतो. - कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी तीनदा दावेदार होते. १९९९ मध्ये त्यांच्या जागी एस.एम. कृष्णा आणि २००४ मध्ये त्यांचे मित्र धरमसिंह यांना मुख्यमंत्री करण्यात आले. २०१३ मध्ये सिद्धरामय्या यांनी तिसऱ्यांदा खरगे यांना मागे टाकले होते.

वाद - सिद्धरामय्या सरकारमध्ये मुलगा प्रियांकला मंत्री केल्यावर खरगे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप झाला. - मुलगी प्रियदर्शिनीला बंगळुरूमध्ये नियम डावलून प्रॉपर्टी मिळवून दिल्याचा आरोप. ही मालमत्ता त्यांना परत करावी लागली.

बातम्या आणखी आहेत...