आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये वावटळीमुळे लग्नाचा एक मंडप लोखंडी पाईपसह पतंगासारखा हवेत उडाल्याची घटना घडली आहे. काही जणांनी हा टेंट पकडण्याचा प्रयत्न केला. पण वावटळीमुळे धुळीचा लोट उठताच त्यांना पळता भूई थोडी झाली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 45 बाय 45 चा हा टेंट 200 फूट उंचीपर्यंत उडाल्याचे सांगण्यात येत आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, खरगोन जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 70 किमी अंतरावरील झिरन्या ठाणे हद्दीतील कुसुंबिया गावात दुपारच्या सुमारास जबरदस्त वावटळ आली होती. त्यावेळी गावात लग्न समारंभाची तयारी सुरू होती. वावटळीमुळे टेंट उडत असल्याचे पाहून गावकऱ्यांनी तो पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात धुळीच्या लोटासह वेगवान वावटळ आली. त्यात 45 बाय 45 चा टेंट एखाद्या पतंगासारखा जवळपास 200 फूट उंच उडाला.
शेतात उभारण्यात आला होता टेंट
यासंबंधीच्या माहितीनुसार, गावात तेरसिंग सुमाळ यांची मुलगी ज्योतीचे लग्न होते. यासाठी शेतात मंडप उभा करण्यात आला होता. पिचडीया गावातून वरात पोहोचली होती. लग्नानंतर पाहुण्यांना जेवण वाढण्याची तयारी सुरू होती. दरम्यान, वादळी वाऱ्याने विवाह सोहळ्याची संपूर्ण व्यवस्था उधळली.
काही जणांनी त्या ही स्थितीत पाईप पकडून टेंट उडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. पण वावटळीचा वेग पाहून लोकांनी तेथून पळून जाणेच पसंत केले यावेळी लग्न समारंभाला आलेल्या काही जणांनी या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.
हवेत उडाल्यानंतर वीजेच्या तारांवर कोसळला टेंट
200 फूट उंच उडाल्यानंतर टेंट 11 केव्हीच्या एका वीज वाहिनीवर पडला. त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने वीजपुरवठा बंद केला. सुदैवाने यावेळी कुणीही जखमी झाले नाही. लोखंडी पाईप असलेला टेंट हवेत उडून खाली पडल्याने काही गोंधळ उडाला. लोक घाबरून इकडे-तिकडे पळू लागले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.