आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात केमला येथे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या उपस्थितीत आयोजित “किसान महापंचायत’मध्ये शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. आपल्याच मतदारसंघात खट्टर यांना विरोध सहन करावा लागला. रविवारी पोलिसांना गुंगारा देत आंदोलक शेतकरी शेताच्या मार्गाने केमला येथे पोहोचले. कार्यक्रमस्थळी त्यांनी प्रचंड तोडफोड केली. पोलिसही त्यांना रोखू शकले नाहीत. मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच कृषी कायद्यांना विरोध करणारे हे शेतकरी पोहोचले आणि त्यांनी काळे झेंडे दाखवले. खट्टर यांच्याविरोधात त्यांनी घोषणाबाजीही केली. व्यासपीठाची तोडफोड केली. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर ज्या हेलिपॅडवर उतरणार होते त्यावरही शेतकऱ्यांनी खड्डे केले. यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द करण्यात आला. शेतकऱ्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी या वेळी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला. नंतर लाठीमार आणि अश्रुधुराचा वापरही करावा लागला. यादरम्यान स्थानिक लोक आणि बाहेरून आलेल्या शेतकऱ्यांत हाणामारी झाली. यात काही शेतकरी जखमी झाले आहेत.
पंजाबमध्ये भाजपच्या धरणे आंदोलनाला विरोध
पंजाबमधील कायदा-सुव्यवस्थेच्या विरोधात राज्यात ११७ मतदारसंघांत आंदोलनाची तयारी भाजपने केली आहे. रविवारी जालंधर येथे पक्षाने धरणे धरले. यादरम्यान कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी येथे दाखल झाले. जोरदार घोषणाबाजी झाली. यामुळे काही काळ या भागात तणाव निर्माण झाला.
मुख्यमंत्री खट्टर यांची खुर्ची अशी रिकामी राहिली, भाजप कार्यकर्ते मंदिरात लपले
किसान पंचायतीत मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधणार होते. भारतीय किसान युनियनने याला विरोध केला होता. पोलिसांनी सात ठिकाणी नाकेबंदी करूनही आंदोलक शेतकरी शेताशेतांतून केमला येथे पाेहाेचू लागले. पोलिसांनी लाठीमार केला. या पळापळीत एक संघटना कार्यक्रमस्थळी पोहाेचली. त्यांनी व्यासपीठाची मोडतोड केली. कृषी कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित या पंचायतस्थळी राज्याच्या एका कॅबिनेटमंत्र्यासह सुमारे २००० शेतकरी उपस्थित होते. या वेळी दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली.
प्रातिनिधिक निदर्शनांचा शब्द पाळला नाही
एक दिवस आधी शेतकऱ्यांनी प्रातिनिधिक निदर्शने करू असा शब्द दिला होता. मात्र, गुरनामसिंग चढनी यांनी शेतकऱ्यांना भडकावले. यात काँग्रेसचा हात आहे.’ -मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री, हरियाणा
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.