आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाब V कोलकाता:कोलकाता नाईट राइडर्सचा पंजाबवर एकहाती विजय, रसेलने 8 उत्तुंग षटकार ठोकत फटकावल्या 31 चेंडूत 70 धावा, 15 व्या षटकातच 138 धावांचे आव्हान

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 8 व्या सामन्यात ​​​​​​कोलकाता नाईट रायडर्सने 'पंजाब किंग्ज'वर एकहाती विजय मिळविला. त्यांनी हा सामना 6 गडी राखून जिंकला.

अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल 8 उत्तुंग षटकार ठोकत कोलकाताच्या विजयाचा शिल्पकार बनला. पंजाबने 138 धावांचे लक्ष्य दिले होते, ते केकेआरने 15 व्या षटकातच पूर्ण केले.

आंद्रे रसेलने 31 चेंडूत 70 धावा फटकावल्या यात त्याने 50 धावा तर अवघ्या 26 चेंडूत कुटल्या आणि पंजाबच्या गोलंदाजांना 'सळो की पळो' करून सोडले.

पंजाबकडून राहुल चहर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 2 बळी घेतले. पंजाबची फलंदाजी आज ढेपाळली. यात भानुका राजपक्षेने 31 धावा केल्या. त्याच्याशिवाय बाकी फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. 10व्या क्रमांकावर उतरलेल्या कागिसो रबाडाने 25 धावांची खेळी करत संघाची लाज वाचवली आणि धावसंख्या 137 पर्यंत पोहोचवली. कोलकाताकडून उमेश यादवने शानदार गोलंदाजी करत 4 बळी घेतले.

सुरूवातीला कोलकाता व पंजाबची लढत रोमांचकारी झाली. दोन्ही संघाची सुरुवात काहीशी अडखळत झाली व त्यांचे सुरुवातीचे फलंदाज लवकर तंबुत परतले. कोलकाताकडून तुफान फटकेबाजी करीत रसेलने संघासाठी एकहाती विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा संघ ऑल आऊट झाला. त्यांनी ​​​​कोलकाता नाईट राईडरसमोर 138 धावांचे आव्हान ठेवले. त्यानंतर कोलकातातर्फे रसेलने धुव्वाधार फलंदाजी करून विजयश्री खेचून आणली.

कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबचा सलामीचा फलंदाज मयंक अग्रवाल सपशेल अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या भानुका राजपक्षेने धडाकेबाज कामगिरी केली. त्याने दमदार फलंदाजी करत कोलकाताच्या गोलंदाजांना काही काळ घाम फोडला.

सलामीला आलेला मयंक अग्रवाल उमेश यादवच्या चेंडूचा सामना करताना पायचित झाला. एक धाव करुन तंबुत परतल्यानंतर पंजाबचील पडझड सुरु झाली. मैदानात उतरलेल्या भानुका राजपक्षेने संघाची धावगती वाढवली. फलंदाजीसाठी येताच त्याने जोरदार फटकेबाजी सुरु केली.

सामन्यातील क्षणचित्रे...

1. षटकाराचा राजा आंद्रे रसेल

तुफानी खेळी खेळताना आंद्रे रसेलने 31 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. रसेलने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 10वे अर्धशतक 26 चेंडूत पूर्ण केले. आपल्या डावात 8 षटकार ठोकणाऱ्या रसेलने या स्पर्धेत 150 षटकारही पूर्ण केले आहेत. आंद्रे रसेल आयपीएलमध्ये 150 पेक्षा अधिक षटकार मारणारा 12 वा खेळाडू ठरला. तसेच त्याने सॅम बिलिंग्ज (24) सोबत 47 चेंडूत नाबाद 90 धावांची 5 व्या विकेटसाठी कोलकात्याच्या विजयात भर घातली.

2. चहरने एका षटकात घेतले 2 बळी

राहुल चहरने सामन्याच्या पहिल्याच षटकात 3 चेंडूत 2 बळी घेतले. राहुलने 7 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर श्रेयस अय्यरला (26) बाद केले आणि शेवटच्या चेंडूवर नितीश राणा शून्यावर पायचित झाला. चहरने 4 षटकात 13 धावा देत 2 बळी घेतले.

३ कागिसो रबाडाची तळपली बॅट

पंजाबकडून पहिला आयपीएल सामना खेळणारा कागिसो रबाडा याने सामन्याच्या पंधराव्या षटकात फलंदाजीत कमाल केली. त्याने कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजाची धुलाई केली व संघाला सन्मानजनक स्थितीत आणुन ठेवले. रबाडा 16 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. रबाडाच्या झंझावाती खेळीला आंद्रे रसेलने ब्रेक लावला. साउथी लाँग ऑफवरून धावत आला आणि त्याने कागिसोचा डाय मारून सुरेख झेल टिपला. तेव्हा संघाची धावसंख्या 137 होती. त्यानंतर शेवटचा फलंदाज धावचित झाला व 20 ओव्हरआधीच पंजाबचा संघ ऑल आऊट झाला.

4. स्टार्स, मुलांनी घेतला सामन्याचा आस्वाद

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, मुलगा आर्यन खान आणि बॉलीवूडची नायिका अनन्या पांडेही या सामन्यात केकेआरला सपोर्ट करण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर पोहोचले. लियाम लिव्हिंगस्टोन बाद झाल्यानंतर हे सर्वजण आनंदाने डोलताना दिसले.

5. उमेशचा पॉवर प्ले, दोन रेकॉर्ड केले

केकेआरचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने पहिल्याच षटकात पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवालला (1) LBW बाद केले. या विकेटसह उमेश आयपीएल पॉवर प्लेमध्ये 50 बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला. पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम संदीप शर्मा (53) यांच्या नावावर आहे. झहीर खान आणि भुवनेश्वर कुमार यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर येते. दोघांनी 52-52 विकेट घेतल्या. उमेश यादव आयपीएलमध्ये कोणत्याही संघाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. यादवने या सामन्यात 23 धावांत 4 बळी घेतले. उमेशने पंजाब किंग्जविरुद्ध एकूण 33 विकेट घेतल्या आहेत. त्याच्यानंतर सुनील नरेनचे नाव कोणत्याही एका फ्रँचायझीविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत येते. नरेनने पंजाबविरुद्धही 32 बळी घेतले आहेत.

6. साउथीने 250 विकेट केल्या पूर्ण

किवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीने टी-20 मध्ये 250 विकेट्स पूर्ण केल्या. टी-20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून 250 विकेट घेणारा साऊथी हा पहिला गोलंदाज ठरला आहे. या सामन्यात त्याने 36 धावांत 2 बळी घेतले. टिमने धवन (16) आणि शाहरुख (0) यांना बाद केले.

7. राजपक्षेने 344 च्या स्ट्राइक रेटने केल्या धावा

पंजाबच्या भानुका राजपक्षेने झंझावाती खेळी करताना अवघ्या 9 चेंडूत 31 धावा केल्या. श्रीलंकेच्या खेळाडूने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट 344.44 होता. भानुकाची विकेट शिवम मावीने घेतली, मिडऑफवर टीम साऊथीने त्याचा झेल घेतला. बाद होण्यापूर्वी राजपक्षेने त्याच षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार आणि पुढच्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार ठोकले.

8. पॉवर प्लेमध्ये दोन्ही संघांनी दाखवली ताकद

पॉवर प्लेमध्ये कोलकाताने मयंक अग्रवाल (1), भानुका राजपक्षे (31) आणि शिखर धवन (16) यांचे बळी घेतले. या तीन विकेट उमेश, मावी आणि साऊदी यांनी घेतल्या. मात्र, पंजाबने आपली ताकद दाखवत 10.33 च्या धावगतीने 62 धावा केल्या.

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आज कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 7.30 वाजता लढत सुरू झाली. तत्पुर्वी KKR संघाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजीचा निर्णय घेतला. विशेषतः सामना सुरु होण्यापुर्वी चाहत्यांनी शंखनाद केला व संघाना प्रोत्साहन दिले.

सामना सुरु होण्याआधीच शंखनाद करताना चाहते.
सामना सुरु होण्याआधीच शंखनाद करताना चाहते.

कोलकाताने या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नईला पराभूत करत दणदणीत विजय मिळवला होता. या सामन्यात अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर सॅम बिलिंग्स यांनी चांगली कामगिरी केली होती. आजच्या सामन्यातही हे खेळाडू उत्तम खेळ खेळतील अशी आशा आहे. तर शिवम मावी, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती यांना आजच्या सामन्यात चांगला खेळ करावा लागेल. उमेश यादवने पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात दोन-दोन बळी घेत चांगली कामगिरी केली होती.

कोलकाताचेच पारडे जड
आतापर्यंत केकेआर आणि पीबीकेएसचे संघ आयपीएलमध्ये 29 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये कोलकाताने 19 वेळा, तर पंजाबने 10 वेळा बाजी मारली आहे. KKR ने 2018 मध्ये PBKS विरुद्ध एका डावात सर्वाधिक 245 धावा केल्या होत्या, तर 109 ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या होती. त्याचवेळी पंजाबने कोलकाताविरुद्ध एका डावात सर्वाधिक 214 धावा केल्या होत्या आणि त्यांनी 119 धावांचा सर्वात कमी आकडा गाठला होता. गेल्या मोसमात दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला होता. आजच्या विजयाने कोलकाताने पुन्हा आपणच वरचढ असल्याचे दाखवून दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...