आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्ह्याचे कलम बदलले:लखीमपूर शेतकरी हत्याकांड हा मंत्रिपुत्राचा पूर्वनियोजित कटच! शेतकऱ्यांना जाणूनबुजून चिरडले होते : एसआयटी

लखनऊएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लखीमपूर खिरीमधील शेतकरी हत्याकांड हा मंत्रिपुत्राचा पूर्वनियोजित कटच होता, असा धक्कादायक दावा एसआयटीने (विशेष तपास पथक) केला आहे. ३ आॅक्टोबर रोजी केंद्रीय गृृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने कटकारस्थान रचून ४ शेतकऱ्यांना हेतूपुरस्सर गाडीखाली चिरडले. ही घटना निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे घडली असे नव्हे, तर हे पूर्वनियोजित हत्याकांड होते, असे एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेनंतर उसळलेल्या दंगलीत ४ जण ठार झाले होते. एसआयटीने दोन महिन्यांनंतर एफआयआरमधील दोन भादंवि कलमांमध्येही बदल केला आहे. आता हत्येचे कलम ला‌‌वण्यात आले. न्यायालयाने त्यास मंजुरी दिली. एफआयआरमध्ये आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहे. कलम बदलल्याने आशिषसह अटक झालेल्या १४ जणांवर कट रचून हत्या केल्याचा खटला चालेल. मंगळवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करून नव्या कलमांनुसार वॉरंट जारी करीत तुरुंगात रवानगी करण्यात आली. दरम्यान, मंत्री अजय यांनी तुरुंगात आपल्या मुलाची भेट घेतली.

एसआयटीचे अधिकारी विद्याराम दिवाकर यांच्या अर्जानुसार कलमे बदलण्यात आली. आता भादंवि कलम २७९, ३३८ आणि ३०४ अ ऐवजी ३०७, ३२६, ३०२, ३४, १२० बी,१४७, १४८, १४९, ३/२५ शस्त्रास्त्र प्रतिबंध कायद्यांन्वयेही खटला चालेल. दरम्यान, आशिष मिश्राचे वकील अवधेशसिंह यांच्या मते बळजबरीच कलमे घुसवण्यात आली आहेत. या बदलांमुळे आशिषसह इतर आरोपींना आता जामीन मिळणे अत्यंत अवघड असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

पुढील संकट... कलमे बदलल्याने प्रकरण आणखी गंभीर, आरोपींना जामीन मिळणे कठीण
वकील अवधेश म्हणाले, कलमे बदलल्याने प्रकरण आणखी गंभीर झाले आहे. जी नवीन कलमे लावली आहेत, त्यासाठी खालच्या न्यायालयात नव्याने जामीन अर्ज द्यावा लागेल. एसआयटीने सर्व तथ्ये दिली नाहीत. शस्त्रास्त्र कायदा कोणावर लागेल, हे सांगितले नाही.

निवडणुकीवर नजर... लखीमपूर व आजूबाजूच्या ६ जिल्ह्यांच्या ४२ जागा विजय-पराभव ठरवतात
लखीमपूर उत्तर प्रदेशमधील सर्वात मोठा जिल्हा आहे. लखीमपूर खिरी आणि आजूबाजूच्या ५ जिल्ह्यांत ४२ विधानसभा जागा आहेत. २०१७ मध्ये येथे भाजपला ३७ जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे विजय मिळाला. २०१२ मध्ये ५ जागा मिळाल्या होत्या.

फटकारल्याचा परिणाम... खून प्रकरणात जशी कारवाई होते, तशीच यातही करा : कोर्ट
लखीमपूरप्रकरणी सुप्रीम कोर्टाने सरकारला म्हटले होते की, खुनाच्या इतर प्रकरणांत जशी कारवाई होते, तशीच ती यातही करा. हे गंभीर प्रकरण आहे, पण त्याकडे जसे पाहिले जावे तसे पाहिले जात नाही. त्यावर, सर्व उणिवा दूर करू, असे सरकारने म्हटले होते.

काय घडले होते? ४ शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या एसयूव्हीत मंत्र्याचा मुलगाही होता
३ अॉक्टोबरला उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य लखीमपूर खिरीच्या दौऱ्यावर होते. ते केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रांच्या बनवीरपूर गावात कार्यक्रमात सहभागी होणार होते. अजय मिश्रा त्यांच्यासोबतच होते. दुपारी सुमारे १:३० वाजता ताफ्यासोबत लखीमपूरहून बनवीरपूरकडे निघाले होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी बनवीरपूरहून तीन वाहने निघाली होती. तिकुनियामध्ये शेतकरी काळे झेंडे घेऊन निदर्शने करत होते. यांची त्यांच्याशी जुंपली. त्यानंतर ‘अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष’च्या एसयूव्हीने शेतकऱ्यांना चिरडले. यात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणाले होते : माझा मुलगा घटनास्थळी नव्हता, सिद्ध झाल्यास राजीनामा देईन, प्रश्न-खुर्ची केव्हा सोडणार?
लखीमपूर प्रकरणानंतर दोन दिवसांनीच म्हणजे ५ ऑक्टोबरला माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी म्हटले होते, ‘मी आणि माझा मुलगा घटनास्थळी हजर नव्हतो, हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरावे आहेत. माझा मुलगा तेथे होता हे पुराव्यासह सिद्ध झाल्यास लगेच मंत्रिपदाचा राजीनामा देईन.’

विरोधकांचा हल्ला...राहुल गांधी म्हणाले, मोदीजी, पुन्हा माफी मागण्याची वेळ आली आहे, पण आधी आरोपीच्या पित्याला मंत्रिपदावरून हटवा. प्रियंका गांधी म्हणाल्या, या कटात गृह राज्यमंत्र्यांची काय भूमिका होती, याचा तपास करणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदींना उद्देशून त्या म्हणाल्या की, शेतकरीविरोधी मानसिकतेमुळे अद्यापपर्यंत मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही.

बातम्या आणखी आहेत...