आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखीमपूर हिंसा:कोर्टाच्या कठोर प्रश्नांमुळे मंत्र्याच्या मुलाच्या अटकेसाठी दबाव वाढला, कोर्टाने यूपी सरकारकडून मागवला अहवाल

नवी दिल्ली/लखनऊ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखीमपूर खिरीत ४ शेतकऱ्यांसह ८ जणांच्या मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या कठोर प्रश्नांमुळे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिषच्या अटकेसाठी दबाव वाढला आहे. यूपी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी आशिषच्या घरावर नोटीस चिकटवून शुक्रवारी सकाळपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्याआधी पोलिसांनी लवकुश आणि आशिष पांडेय यांना अटक केली, तर इतर तिघांची चौकशी सुरू आहे.

सुप्रीम कोर्टाने दोन पत्रांची दखल घेतली. या घटनेत किती शेतकरी मारले गेले, किती राजकीय लोकांचा आणि पत्रकारांचा मृत्यू झाला, कोणाविरुद्ध गुन्हा नोंदला गेला, कोणाची अटक झाली, अशी विचारणा कोर्टाने यूपी सरकारकडे केली. यूपी सरकारला या प्रकरणी शुक्रवारी उत्तर द्यायचे आहे. नंतर सुनावणी होईल.

दूसरीकडे, यूपी सरकारने गुरुवारी सकाळीच हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती प्रदीप श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय चौकशी आयोग स्थापन केला आहे.

अंबालात भाजप खासदार सैनींवर शेतकऱ्यांना धडक दिल्याचा आरोप
दुसरीकडे, कुरुक्षेत्रचे भाजप खासदार नायाब सैनी यांच्या कारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना धडक देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप हरियाणातील अंबालात शेतकऱ्यांनी केला आहे. या घटनेत एक शेतकरी जखमी झाला. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा खासदार आणि त्यांचे समर्थक कार्यक्रमानंतर बाहेर जात होते तेव्हा चकमक झाली, पण कुठल्याही दुर्घटनेची माहिती आम्हाला नाही.

प्रियंका, अखिलेश यांनी घेतली शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट
शेतकरी गुरविंदर यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींना पोलिसांनी रोखले तेव्हा त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. नंतर प्रशासनाने परवानगी दिली. सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मोहालीहून लखीमपूरकडे निघालेले पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धूंना सहारनपूरमध्येच रोखण्यात आले.

आपण क्रूर आहोत, असा संदेश शेतकऱ्यांत जाऊ नये : वरुण गांधी यांची स्पष्टोक्ती
भाजप खासदार वरुण गांधींनी घटनेचा आणखी एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले,‘आंदोलकांना हत्येने गप्प बसवता येऊ शकत नाही. आपण क्रूर आहोत, असा संदेश शेतकऱ्यांत जाऊ नये.’ दरम्यान, संघाचे पदाधिकारी इंद्रेशकुमार म्हणाले की, ही घटना दु:खद आहे. पण विरोधी पक्ष द्वेषाचे वातावरण निर्माण करत आहेत.

आरोपींचा शोध सुरू असल्याची पोलिसांची माहिती
लखनऊ परिक्षेत्राच्या पोलिस महानिरीक्षक लक्ष्मी सिंह यांनी सांगितले की, आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात आम्हाला यश मिळेल, अशी खात्री आहे. आशिष मिश्रा सध्या कुठे आहे, हे आम्हाला माहीत नाही. दरम्यान, आशिष पांडेय आणि लवकुश हे थार जीपच्या मागे जात असलेल्या वाहनात होते, असा आरोप आहे.

बातम्या आणखी आहेत...