आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखीमपूर हिंसाचार:विरोधक एकवटले, प्रियंकांना अटक; एका शेतकऱ्याचे पुन्हा पोस्टमॉर्टेम, सीबीआय चौकशीची मागणी

लखनऊ/लखीमपूर खिरी15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखीमपूर खिरीतील हिंसाचारावरून राजकारण तापले आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींच्या अटकेनंतर विरोधी पक्ष एकवटत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात ५ सदस्यीय टीमने बुधवारी लखीमपूरला जाण्याची परवानगी मागितली. रात्री उशिरा यूपी सरकारने लखनऊत कलम १४४ लागू करत परवानगी नाकारली. तत्पूर्वी, लखीमपूरला जाण्याचा प्रयत्न करणारे आप खासदार संजय सिंह यांना यूपी पोलिसांनी अटक केली. मात्र, तृणमूलच्या दोन महिला खासदारांनी पोलिसांना चकवून मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या भेटी घेतल्या. दरम्यान, हिंसाचारात ठार ४ पैकी गुरविंदर सिंह या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी पुन्हा पोस्टमॉर्टेमची मागणी केली. त्यांचा आरोप आहे की, गुरविंदर यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला. अहवालात त्याचा उल्लेख नाही. यानंतर एक पथक लखनऊहून आले. कुटुंबीयांनी २ खासगी डॉक्टर्सच्या उपस्थितीत पोस्टमॉर्टेमला संमती दिली.

दुसरीकडे, लखीमपूरला जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना यूपी पोलिसांनी मंगळवारी पहाटे ४:३० वाजता अटक केली. प्रियंकांना सीतापूरच्या पीएसी गेस्ट हाऊसमध्ये ठेवले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय लल्लू व राज्यसभा खासदार दीपेंद्र हुड्डांसह १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी म्हणाले, घटनास्थळी आपला मुलगा हजर असल्याचा व्हिडिओ कुणी दिला तर राजीनामा देऊ. शेतकऱ्यावर गाडी घालणाऱ्या चालकाला जमावाने मारून टाकल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसते. माझ्या मुलाने गाडी घातली असती तर त्याला मारले असते. दुसरीकडे, एडिटर्स गिल्डने लखीमपूरमध्ये पत्रकार रमण कश्यप यांच्या मृत्यूची स्वतंत्र चाैकशीची मागणी केली. जगजित सिंहच्या अहवालावरून दाखल एफआयआरनुसार, निदर्शकांना चिरडणाऱ्या कारमध्ये आशिष मिश्रा बसलेला होता. त्याने शेतकऱ्यांवर गोळीबारही केला.

हेलिकॉप्टरने पाठवले डॉक्टर, एडीजी-राकेश टिकैतही पोहोचले
पुन्हा पोस्टमाॅर्टेम करण्याची नातेवाइकांची मागणी पूर्ण करण्यासाठी लखनऊहून डॉक्टरांची टीम हेलिकॉप्टरने बहराइचला पाठवण्यात आली. भाकियू प्रवक्ता राकेश टिकैत बहराइचला पोहोचले. एडीजी अखिलकुमार यांनाही पाठवले. मृत शेतकरी गुरविंदरसिंग यांच्या वडिलांशी प्रियंका गांधींनी फोनवर चर्चा केली. तत्पूर्वी, लवलीत यांच्या नातेवाइकांनी पीएममध्ये घोटाळ्याचा आरोप करत अंत्यसंस्कारास नकार दिला होता. तथापि, टिकैत यांच्याशी चर्चेनंतर ते राजी झाले.

सुप्रीम कोर्टाला लिहिले पत्र : लखीमपूर खिरी हिंसाचाराचे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आहे. दोन वकिलांनी मंगळवारी पत्र लिहून सुप्रीम कोर्टाच्या निगराणीत घटनेची सीबीआय चौकशी करण्याची विनंती केली आहे.

विरोधकांचा निशाणा : अखिलेश म्हणाले-विद्यमान न्यायमूर्तींनी चौकशी करावी, पवार म्हणाले-विरोधक शेतकऱ्यांसोबत आहेत

छत्तीसगड सीएमचे धरणे
प्रियंका गांधींना भेटण्यास गेलेले छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना मंगळवारी दुपारी लखनऊ विमानतळावरच रोखण्यात आले. त्याविरोधात त्यांनी तेथेच धरणे आंदोलन सुरू केले.

लखीमपूर हिंसाचारावरून सर्वच विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे :
- काँग्रेस नेते पी. चिदंबरम म्हणाले, प्रियंकांची अटक बेकायदा आहे. पहाटे ४.३० वाजता कारवाई झाली. एकही महिला अधिकारी नव्हती. हा सत्तेचा दुरुपयोग आहे.
- सपाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, घटनेची चौकशी विद्यमान न्यायमूर्तींमार्फत करावी.
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, सर्व विरोधक शेतकऱ्यांसोबत आहेत.
- द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन म्हणाले की, तिन्ही कृषी कायदे हटवल्यानंतरच देशात शांतता येईल.
- माकपने म्हटले की, आम्ही संयुक्त किसान मोर्चासोबत ११ ऑक्टोबरपर्यंत निदर्शने करू.

व्हिडिओत वाहनातून उतरून पळत असल्याचे दिसलेला युवक समोर आला
हिंसाचाराचे दोन व्हिडिओ समोर आले आहेत. शेतकऱ्यांमधून सायरन वाजवणाऱ्या वाहनांचा ताफा निघत असून त्यापैकी एक वाहन शेतकऱ्यांना चिरडत निघून जाते, असे एका व्हिडिओमध्ये दिसते. एका वाहनातून काही लोक उतरून पळत असल्याचे दुसऱ्या व्हिडिओत दिसत आहे. त्यापैकी एक व्यक्ती समोर आली आहे. तो भाजपचा कार्यकर्ता सुमीत जायसवाल असून शिवपुरी वॉर्डाचा नगरसेवक आहे. त्याने मंगळवारी माध्यमांना सांगितले की, मी वाहनात होतो. आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांसह समाजकंटकांनी वाहनावर काठ्या, दगड व तलवारीने हल्ला केला. वाहनात बसलेल्या लोकांच्या हत्येचा प्रयत्न होता. सुमीतने आंदोलकांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

बातम्या आणखी आहेत...