आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ सुरू होईपर्यंत उत्तर भारतात थंडीचा प्रकोप सुरू आहे. डोंगराळ भागांत सातत्याने हिमवृष्टी होत आहे आणि डोंगरावरून येणाऱ्या बर्फाळ हवेमुळे मैदानी भागात कडक्याची थंडी पडत आहे. यामुळे १० ते ५० वर्षांपर्यंतचे विक्रम मोडीत निघत आहेत. मात्र, ज्या डोंगरांवरून येणाऱ्या थंड हवेमुळे मैदानी भाग विक्रमी थंडीच्या तावडीत आहे, त्या डोंगराळ भागांत कसल्याच विक्रमाची नोंद होत नाहीये.
खासगी हवामान संस्था स्कायमेटचे शास्त्रज्ञ महेश पालावत सांगतात की, डोंगरातील उंच भागात हिमवृष्टीमुळे अनेक भागांतील तापमान शून्याच्या खाली गेले आहे. मात्र, ही स्थिती सामान्य आहे. द्राससारख्या भागात तर शून्याच्या खाली उणे ३५-४० अंशांपर्यंत तापमान जाते. तो सायबेरियानंतर दुसरा सर्वात थंड भाग मानला जातो. मात्र या वेळी तापमान सध्या उणे २८-३० अंशांपर्यंतच खाली गेले आहे. उदाहरण बघता, दिल्लीत १ जानेवारीला किमान तापमान १.१ अंश सेल्सियस नोंदवले गेले, जे मागील १५ वर्षांतील जानेवारीचे सर्वात कमी तापमान आहे. याआधी ८ जानेवारी २००६ रोजी ०.६ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले होते.
राजस्थानातील चुरूमध्ये ३० डिसेंबरला तापमान शून्याच्या खाली उणे १.५ अंश नोंद झाले. १ जानेवारीला उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि मथुरेमध्ये तापमान ०.५ अंश नोंद झाले. मथुरेत आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. याउलट काश्मिरातील श्रीनगरमध्ये शनिवारी किमान तापमान उणे ५.९ अंश आणि गुलमर्गमध्ये उणे ९ अंश नोंद झाले, तर श्रीनगरमध्ये किमान तापमानाचा आतापर्यंतचा विक्रम वर्ष १९००च्याही आधी उणे १४.४ अंशांचा आहे.
कारण : पश्चिमी विक्षोभामुळे मैदानी भागात आकाश निरभ्र, थंडी जास्त
हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. कुलदीप श्रीवास्तव सांगतात, मागोमाग येणाऱ्या पश्चिमी विक्षोभादरम्यान जे अंतर पडत आहे त्यात मैदानी भागात आकाश एकदम निरभ्र होते. डोंगरावरून येणाऱ्या बर्फाळ हवेमुळे तापमानात घट होत आहे. दुसरीकडे हवामानाचा जागतिक घटक ला निनाचाही परिणाम आहे. प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान घटत असल्यानेही उत्तर भारतात तापमान कमी आहे. तर डोंगरावर आकाश ढगाळ राहत असल्याने तापमानात अपेक्षेएवढी घट होत नाहीये.
पुढे काय: ७ जानेवारीपासून पुन्हा थंडी
डोंगरावर हिमवृष्टी व मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस व काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे. काश्मिरातून एक पश्चिमी विक्षोभ निराेप घेत आहे व पुढील पश्चिमी विक्षोभ रविवारी प्रभाव दाखवेल. पुढील तीन दिवस त्याचा प्रभाव असेल. या दरम्यान मैदानी भागात ढग असल्याने तापमानात वाढ होईल मात्र ७ जानेवारीपासून पुन्हा हवेत बदल झाल्यास थंडी वाढेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.