आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Madhya Pradesh 3 Baby Postmortem Update; Girl Died During Treatment | MP Crime News

3 महिन्यांच्या मुलीच्या दफन मृतदेहाचे पोस्टमॉर्टम:अंधश्रद्धेमुळे गरम सळ्यांनी 51 वेळा डागले होते, मध्य प्रदेशात घडली होती घटना

भोपाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्य प्रदेशात आणखी एका मुलीला 24 वेळा गरम सळ्यांनी डागण्यात आले. - Divya Marathi
मध्य प्रदेशात आणखी एका मुलीला 24 वेळा गरम सळ्यांनी डागण्यात आले.

मध्य प्रदेशात अंधश्रद्धेमुळे एका 3 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. ही घटना 15 दिवसांपूर्वी घडली होती. आता तिचा मृतदेह बाहेर काढून त्याचे पोस्टमॉर्टम केले जाणार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या दुधपित्या मुलीचा गरम सळ्याने तब्बल 51 वेळा डागण्यात आले होते. यामुळे तिची प्रकृती बिघडली आणि अखेर तिचा मृत्यू झाला.

भोंदूबाबाचा डागण्याचा अघोरी उपचार

शहडोल जिल्ह्यातील सिंहपूर ठाणे हद्दीतील कठौतिया येथे ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, या 3 महिन्यांच्या मुलीला न्यूमोनिया झाला होता. यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. अंधश्रद्धेमुळे तिचे कुटुंबीय तिला एका भोंदूबाबाकडे घेऊन गेले. या भोंदूबाबाने तिला एकदा नव्हे तर तब्बल 51 वेळा गरम सळ्यांनी डागले. यामुळे या मुलीची प्रकृती अधिकच बिघडली. त्यामुळे शेवटी तिला घाईगडबडीत शहडोल वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. पण अखेर तिचा मृत्यू झाला.

आंगनवाडी कार्यकर्तीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष

शहडोलच्या कलेक्टर वंदना वैद्य यांनी सांगितले की, 'आंगनवाडी कार्यकर्तीने मुलीच्या आईला दोनवेळा तिला न डागण्याचा सल्ला दिला होता. पण त्यानंतरही तिला डागण्यात आले. महिला बालविकास अधिकारी रुग्णालयात गेले असता ही घटना 15 दिवस जुनी असल्याचे निष्पन्न झाले. न्यूमोनियाचा संसर्ग वाढला होता. अखेर त्यामुळेच तिचा मृत्यू झाला.'

मध्य प्रदेशात डागण्याची जुनी कुप्रथा

मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल भागांत अंधश्रद्धेमुळे मुलांना गरम सळ्यांचे चटके दिले जातात. त्याला डागणे असे म्हटले जाते. या कुप्रथेविरोधात प्रशासन जनजागृती मोहीमही राबवत आहे. पण त्याचा कोणताच फायदा होत नाही. 'एनडीटीव्ही'ने डॉक्टर विक्रांत भूरिया यांचा दाखला देत म्हटले आहे की, 'डागणे हे वेदना लपवण्याची एक पद्धत आहे. पण ती प्राणघातक ठरू शकते.'

कठौतियालगतच अन्य एक घटना

उल्लेखनीय बाब म्हणजे मध्य प्रदेशातच असेच आणखी एक प्रकरण उजेडात आले आहे. कठौतिया लगतच्याच सामतपूर गावात उपचाराच्या नावाखाली मुलीला 24 वेळा गरम सळ्यांचे चटके देण्यात आलेत. सध्या तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 3 महिन्यांच्या या शुभी कोल नामक मुलीलाही श्वसनाचा त्रास होत होता. तिची आई सोनू कोल व वडील सूरज कोल यांनी तिला एका बोगस डॉक्टरला दाखवले. पण प्रकृती सुधारली नाही. त्यानंतर तिला डागण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...