आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापूर्वी आंदोलन:DJ बंद केल्यामुळे वर-वधूचे धरणे, म्हणाले - पोलिसांनी गैरवर्तन केले; 3 तासांच्या 'ठिय्या' आंदोलनानंतर केले लग्न

रतलाम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशातील रतलाममध्ये DJ बंद केल्याच्या निषेधार्थ वर-वधूने वऱ्हाडी मंडळीसह पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केल्याची घटना घडली आहे. वैवाहिक जीवनात प्रवेश करणाऱ्या या वर-वधूने पोलिसांवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी समजूत घातल्यानंतर या जोडप्याने गुरुवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास एकमेकांशी लग्नगाठ बांधली.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, रतलामच्या रेल्वे कॉलनीतील अजय सोलंकी व सीमा यांचे लग्न गुरुवारी रात्री एका मॅरेज गार्डनमध्ये सुरू होते. औद्योगिक ठाण्याच्या चीता फोर्सचे 2 जवान शोभाराम व पंकज तेथून जात होते. लग्नस्थळी DJ मोठ्या आवाजात सुरू असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे या दोन्ही जवानांनी घटनास्थळी जाऊन डीजे बंद करण्याची सूचना केली. यावेळी त्यांचा तिथे उपस्थित पाहुणेमंडळीशी वाद झाला. पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित गैरवर्तनामुळे नाराज सोलंकी कुटुंबीयांनी या प्रकरणी प्रथम जीआरपी चौकी गाठली. त्यानंतर तेथून त्यांना औद्योगिक ठाण्यात पाठवण्यात आले.

वर अजय व वधू सीमा यांनी वऱ्हाडी मंडळींसह धरणे आंदोलन केले.
वर अजय व वधू सीमा यांनी वऱ्हाडी मंडळींसह धरणे आंदोलन केले.

3 तासांपर्यंत सुरू होते विरोध प्रदर्शन

जीआरपी चौकीच्या पोलिस अधिकाऱ्यांनी वर-वधूला तक्रार दाखल करण्यासाठी औद्योगिक ठाण्यात जाण्याची सूचना केली. त्यानंतर त्यांनी औद्योगिक ठाणे परिसरात जाऊन धरणे सुरू केले. जवळपास 3 तास धरणे दिल्यानंतर उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांनी सोलंकी कुटुंबीयांना कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर ते परत जाण्यास तयार झाले.

पोलिसांवर गैरवर्तन केल्याचा आरोप

वर अजय सोलंकी यांनी सांगितले की, लग्न समारंभात पोहोचलेले पोलिस कर्मचारी पंकज बोरासी व शोभाराम यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर करत प्रथम डीजे बंद केला. त्यानंतर कुटुंबातील महिलांशी उद्धटपणा करू लागले. वराने आरोप केला की, दोन्ही पोलिस कर्मचारी दारूच्या नशेत होते. यामुळे त्यांनी पोलिसांकडे या दोघांचीही वैद्यकीय चाचणी करण्याची मागणी केली आहे.

वर-वधू रतलाम ठाण्यात आपल्या कुटुंबीयांसह पोहोचले. तिथे त्यांनी विरोध-प्रदर्शन केले.
वर-वधू रतलाम ठाण्यात आपल्या कुटुंबीयांसह पोहोचले. तिथे त्यांनी विरोध-प्रदर्शन केले.

तक्रार प्राप्त, कारवाई होणार

या प्रकरणी औद्योगिक पोलिस ठाण्याचे प्रभारी राजेंद्र वर्मा यांनी सांगितले की, हनुमान जयंती निमित्त पोलिस पथके संपूर्ण शहरात गस्त घालत होते. वायरलेस सेटवर रेल्वे कॉलनीत मोठ्या आवाजात डीजे वाजत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तो बंद करण्यासाठी स्टेशन रोड ठाण्याचे प्रभारीही पोहोचले होते. आमच्या चीता फोर्सचे जवानही घटनास्थळी पोहोचले होते. डीजे बंद केल्यामुळे नाराज झालेले वर-वधू तक्रार दाखल करण्यासाठी थेट पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांची लेखी तक्रार घेण्यात आली आहे. या प्रकरणी तपासानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.