आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य प्रदेशातील भाजपच्या एका नेत्याने 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. या घटनेमुळे स्थानिकांत संतापाची लाट उसळली आहे. संतप्त जमावाने आरोपी नेत्याची कार पेटवून दिली आहे. तसेच त्याच्या घराबाहेर निदर्शनेही केली आहेत. जमावाला शांत करण्यासाठी या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
बैतुल जिल्ह्यातील कोतवाली ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, रमेश गुल्हाने (58) नामक व्यक्तीने सोमवारी सायंकाळी तिला आपल्या घरी बोलावले होते. येथे त्याने तिच्याशी वाईट कृत्य केले. मुलीच्या माहितीनुसार, यापूर्वीही त्याने तिच्याशी असे कृत्य केले. तो तिला काही पैशांचे आमिष दाखवून कुणाला काहीही न सांगण्याची धमकी देत होता. पण यावेळी मुलीने ही गोष्ट आपल्या पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी लगेचच पोलिसांकडे धाव घेतली.
मुलीवर बलात्कार झाल्याची गोष्ट संपूर्ण परिसरात पसरली. दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी पसार झाला. त्याला अद्याप अटक न झाल्यामुळे लोक संतप्त झाले. ते त्याच्या घरापुढे गोळा झाले. त्यांनी त्याची कार जाळून टाकली. वाढता तणाव पाहता पोलिसांना स्थिती नियंत्रणात आणण्याचा बळाचा सौम्य वापर करावा लागला.
रात्रीपासून पोलिस घटनास्थळी
या ठिकाणी सोमवारी रात्रीपासून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वच पोलिस विभागांचे एसडीओपी व टीआय यांना बैतुलला पाचारण करण्यात आले आहे. त्यांना घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. पोलिसांनी जमावाने जाळलेली कारही घटनास्थळावरून हटवली.
जाळपोळप्रकरणी 4 जण ताब्यात
पोलिसांनी 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भाजप नेते रमेश गुल्हाने यांच्यावर बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अतिरीक्त एसपी नीजर सोनी यांनी सांगितले की, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. त्याच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील. आरोपीची कार जाळल्याप्रकरणी 4 तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
भाजपने बनवले होते एल्डरमन
भाजपने 2004 मध्ये आरोपी रमेश गुल्हाने याची नगरपालिका बैतुलच्या एल्डरमनपदी नियुक्ती केली होती. त्याने भाजपच्या तिकिटावर आझाद वॉर्डमधून निवडणूक लढली होती. पण त्याचा पराभव झाला. आरोपी रमेशचे नाव अनेक वादांतही आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.