आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुणाचे नशीब केव्हा पालटेल हे कुणीच सांगू शकत नाही. जगात 'रावाचा रंक' व 'रंकाचा राव' झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मध्य प्रदेशच्या बडवाणी जिल्ह्यातील एका तरुणासोबतही असाच काहीसा प्रसंग घडला आहे. व्यवसायाने ड्रायव्हर व किरायाच्या खोलीत राहणारा हा तरुण रातोरात कोट्यधीश बनला आहे.
या तरुणाने अवघ्या काही तासांतच ऑनलाइन गेमिंग ॲपवरुन कोट्यवधी रुपये कमावले. यामुळे तो पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे.
सेंधवा वॉर्ड क्रमांक -3 घोडेशाह वली बाबा मोहल्ल्यात राहणाऱ्या शाहबुद्दीन मंसुरी यांच्यासोबत हा स्वप्नवत प्रकार घडला आहे. ड्रायव्हर शहाबुद्दीन मागील 2 वर्षांपासून ऑनलाइन गेमिंग अॅपवर टीम बनवून आपले नशीब आजमावत होते.
49 रुपयांत लावली होती टीम
रविवारी कोलकाता व पंजाबमध्ये झालेल्या सामन्यात शहाबुद्दीन यांनी 49 रुपये एंट्री फीस असणाऱ्या कॅटेगरीत टीम लावली. त्यात ते पहिल्या क्रमांकावर आले. त्यामुळे बक्षीस म्हणून त्यांना 1.50 कोटींची रक्कम मिळाली आहे. एवढी मोठी रक्कम मिळाल्यामुळे शहाबुद्दीन व त्यांच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
ड्रायव्हर शहाबुद्दीन यांनी सांगितले की, ते मागील 2 वर्षांपासून हा गेम खेळत होते. 1 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात त्याने एक टीम तयार केली. त्यात त्याने दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले. सध्या शहाबुद्दीन यांनी दीड कोटींपैकी 20 लाख रुपयांची रक्कम काढली आहे. त्यातील 6 लाख रुपयांची रक्कम कर म्हणून कापली जाईल. उर्वरित 14 लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा होईल.
रातोरात नशीब फळफळले
शहाबुद्दीन यांच्या माहितीनुसार, ते किरायाच्या घरात राहतात. त्यामुळे या बक्षीसाच्या रकमेतून सर्वप्रथम ते आपले घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करतील. त्यानंतर उर्वरित रकमेतून एखादा उद्योग करतील. हे बक्षीस जिंकल्यानंतर शहाबुद्दीन व त्यांच्या कुटुंबाला मोठा आनंद झाला आहे. त्यांचे मित्र व नातेवाईकही त्यांचे कौतुक करण्यासाठी त्यांच्या घरी येत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.