आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राज'सभेवर आजच कारवाई!:पोलीस महासंचालक म्हणाले- मनसेच्या 15 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई; मनसे नेत्यांना नोटिसा

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कुणीही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या कारवाई करू, असा इशारा राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिला आहे. तसेच औरंगाबादेत राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाची औरंगाबाद पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. त्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी औरंगाबाद पोलीस सक्षम आहेत. त्यावर आज कारवाई केली जाईल, असे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी स्पष्ट केले आहे.

सामाजिक एकोप्यासाठी पोलिसांची विविध घटकांशी चर्चा
राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी महाराष्ट्र पोलिस सक्षम आहेत. समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. सामाजिक एकोपा टिकून रहावा, यासाठी विविध समाजघटकांशी आज चर्चा केली आहे. स्थानिक पातळीवरही पोलिसांकडून अनेक बैठका घेतल्या जात आहेत. कुणीही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे रजनीश शेठ यांनी सांगितले.

राज्यभरात SRPF, होमगार्ड तैनात
राज्यातील शांतता अबाधित रहावी, यासाठी राज्यभरात SRPF व होमगार्डच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच, पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. शांतता-सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी जनतेनेही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी केले.

मनसे नेत्यांची राज्य सरकारवर टीका
मनसेच्या १५ हजार कार्यकर्त्यांसह मनसे नेत्यांनाही आज नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सामाजिक तेढ निर्माण होईल व कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल, असे कोणतेही कृत्य न करण्याची सुचना पोलिसांनी या नोटीशींद्वारे दिली आहे. औरंगाबाद मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्या घरी जात पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली. त्यावर सरकारची ही कृती दडपशाहीची असल्याची टीका खांबेकर यांनी केली आहे. तसेच, राज ठाकरेंकडून जो काही आदेश येईल, त्याचे आम्ही पालन करणार असल्याचेही ते म्हणाले.

आम्ही अतिरेकी आहोत का? - संदिप देशपांडे
राज ठाकरे यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढा, ऐवढीच मागणी केली होती. मात्र, त्यावर कारवाई करण्याचे सोडून सरकारकडून आम्हालाच नोटीसा पाठवल्या जात आहेत. आम्ही अतिरेकी आहोत का, असा सवाल मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केला आहे. तसेच, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भोंग्यांविरोधात भूमिका घेतली, त्यांच्या मुलाकडून अशी कारवाई केली जात असल्याबद्दलही देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. हिंदुह्र्दयसम्राटचे पुत्र म्हणवणाऱ्याकडून अशी कारवाई अपेक्षित नाही. उद्धव ठाकरे मुस्लिमांचे लांगूलचालन करत असल्याची टीका संदिप देशपांडे यांनी केली.

राज्य सरकार चुकीच्या मार्गावर - नितीन सरदेसाई
राज्य सरकारने आम्हाला नोटीस नव्हे तर भेट दिली आहे. राज्यातील जनता या सर्व गोष्टींकडे पाहत आहे. सरकार चुकीच्या मार्गावर चालत आहे, असे मनसे नेते नितीन सरदेसाई म्हणाले. तसेच, राज ठाकरेंवर आज कारवाई झाल्यास आम्ही त्याला कायदेशीरच उत्तर देऊ, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

आघाडी नव्हे हे मुगल सरकार - बाळा नांदगावकर
राज्य सरकारने आज पाठवलेल्या नोटीसीवरून हे आघाडी नव्हे तर मुगल सरकार असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली. सुप्रीम कोर्टाने भोंग्यांबाबत जे नियम ठरवून दिले आहेत, त्याची राज्यात अंमलबजावणी व्हावी, एवढीच भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती. मात्र, सरकारकडून दडपशाही केली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...