आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात सुरू असलेल्या अभूतपूर्व राजकीय उलथापालथीवर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपच्या कडव्या विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या संपूर्ण घटनाक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात जे काही चाललंय ते अत्यंत चुकीचं असल्याचं त्या म्हणाल्या.
एक दिवस तुम्हालाही जावे लागेल
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, "ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्हाला उद्धव ठाकरे आणि इतर सर्वांसाठी न्याय हवा आहे. आज तुम्ही (भाजप) सत्तेत आहात, मनी-मसल आणि माफिया पॉवर तुमच्याकडे आहे. पण एक दिवस तुम्हाला जावे लागेल. कुणीतरी तुमचाही पक्ष फोडेल. हे चुकीचे घडतेय आणि मी याचे समर्थन करणार नाही."
इतरही राज्यांतील सरकारे अस्थिर करतील...
त्या पुढे म्हणाल्या की, "आसामऐवजी या बंडखोर आमदारांना पश्चिम बंगालला पाठवा. आम्ही त्यांचा चांगला पाहुणचार करू. आता महाराष्ट्रानंतर ते इतरही राज्यांतील सरकारांना अस्थिर करतील. आम्हाला जनेतसाठी, संविधानासाठी न्याय हवा आहे."
आसाममध्ये भीषण पूर परिस्थिती
दरम्यान, गुवाहाटीत ज्या हॉटेलमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबलेले आहेत, त्या रॅडिसन ब्लूसमोर आज सकाळी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. आसाममध्ये भीषण पूर परिस्थिती असतानाही येथे रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरू असल्याचा आरोप तृणमूल कार्यकर्त्यांनी केला. केंद्र सरकारला आसामच्या पूरग्रस्तांना मदत द्यायला वेळ नाही, मात्र महाराष्ट्रातील आमदारांची येथे मोठी खातीरदारी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. काही वेळानंतर तृणमूल आंदोलकांना आसाम पोलिसांनी ताब्यात घेतले.
राष्ट्रवादीची विरोधी बाकावर बसण्याची तयारी!
महाराष्ट्रातील राजकीय नाट्य आता उत्कंठावर्धक झाले आहे. एकेक करून शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत येण्याचे भावनिक आवाहन करूनही बंडखोरांनी परत न फिरण्याचे संकेत दिले आहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्याचे पाहून राष्ट्रवादी व काँग्रेसमध्येही बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यास आम्ही विरोधी बाकावरही बसण्याची तयारी केल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.