आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Maharashtra's 18,000 Crore Saved , Center Getting Vaccine For 150 Per Dose And For State Is Is Rs 300 To Rs 400

यूटर्न किफायतशीर:लस कंपन्यांच्या खिशात जाता जाता वाचले 18 हजार कोटी, केंद्राला प्रतिडोस 150 तर राज्यांना 300 ते 400 रुपयांना

पवनकुमार | नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 18 ते 44 वयोगटासाठी राज्यांनी लस खरेदी केली असती तर 34,720 कोटी खर्च झाले असते

१८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी केंद्र सरकारने लस खरेदी सुरू केली आहे. शिवाय, कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी केंद्र सरकार प्रतिडोस १५० रुपये दराने खरेदी करेल. हेच दर राज्यांसाठी कोविशील्ड प्रतिडोस ३०० आणि कोव्हॅक्सिन ४०० रुपये असे होते. केंद्राने राज्यांच्या वाट्याची २५ टक्के खरेदी स्वत: करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही खरेदी राज्यांनीच करावयाची होती. यात ३४,७२० कोटी रुपये खर्च झाले असते. आता केंद्र सरकारला यासाठी १६,८०० कोटी रुपये खर्च करावे लागतील. म्हणजे १७,९२० कोटी रुपये वाचतील.

केंद्राने १८ ते ४४ वयोगटासाठी पहिल्या टप्प्यात ४४ कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. यात स्पष्ट करण्यात आले आहे की, सीरम आणि भारत बायोटेककडून जुन्या दरानेच खरेदी केली जाईल. मात्र, कंपन्यांना राज्यांसाठी निश्चित केलेल्या दरानेच केंद्राने लस खरेदी करावी असे वाटते. परंतु, केंद्राने हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळला आहे. कंपन्यांनी लसीचा हा पुरवठा ठरलेल्या वेळी करावा, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.

केंद्र आणखी एक संशोधन करणार
एका व्यक्तीस वेगवेगळ्या कंपन्यांची लस दिल्यावर काय परिणाम होतील, यावर देशात लवकरच अभ्यास केला जाणार आहे. ‘व्हॅक्सिन मिक्सिंग’ला शास्त्रीय भाषेत ‘विषम प्रतिकारशक्ती’ असे म्हटले जाते. यात एखाद्या कंपनीच्या लसीचा तुटवडा भासल्यास व्यक्तीला दुसऱ्या कंपनीची लस दिली जाऊ शकेल. या संदर्भात जर्मनी, फ्रान्ससह काही देशांनी अभ्यास सुरू केला आहे. भारताने अद्याप यासाठी मंजुरी दिलेली नाही. भारतात सध्या कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक-व्ही लसींचा वापर होत आहे. काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, दुसरा डोस वेगळ्या कंपनीचा दिला गेल्यास विषाणूविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती मजबूत होईल. काही देशांत कोविशील्ड/अॅस्ट्राझेनेकासारख्या ‘व्हायरल व्हेक्टर’ लसींबाबत हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे भारतात केंद्र सरकारनेही यावरील अभ्यास करण्याची तयारी सुरू केली आहे. पुढील काही दिवसांत याबाबत घोषणा केली जाऊ शकते.

केंद्र १८-४४ वयोगटासाठी ११२ कोटी डोस खरेदी करणार, डिसेंबरपर्यंत सर्वांचे लसीकरण आरोग्य मंत्रालयानुसार, १८ ते ४४ वयोगटातील ६० कोटी लोकांना लस दिली जाईल. यातील ४ कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. उर्वरित ५६ कोटी लोकांसाठी केंद्र लस खरेदी करून राज्यांना देणार आहे. देशात ९०% लोकांना कोविशील्ड लस दिली जात आहे, तर १० % कोव्हॅक्सिन दिली जात आहे. ११२ डोसपैकी कोविशील्डच्या १००.८ डोससाठी ३०० रुपये याप्रमाणे ३०,२४० कोटी रुपये खर्च झाले असते. तसेच कोव्हॅक्सिनच्या ११.२ कोटी डोसकरिता सुमारे ४४८० कोटी रु.खर्च झाले असते. परंतु आता कोविशील्डवर १५,१२० कोटी आणि कोव्हॅक्सिनवर केवळ १,६८० कोटी रुपयेच खर्च होतील.

खासगी रुग्णालयांत पूर्वीप्रमाणेच लस असेल महाग
खासगी रुग्णालयांत कोविशील्ड ६०० रु. आणि कोव्हॅक्सिन १,२०० रु. प्रतिडोस या दरानेच मिळेल. रुग्णालये १५० रुपये सेवाशुल्क घेऊ शकतील. म्हणजेच जीएसटीसह कोविशील्ड ७८० रु आणि कोव्हॅक्सिन १,४१० रु. प्रतिडोस मिळेल.

बातम्या आणखी आहेत...