आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांची अडवणूक:एसटीला कर्नाटकात बंदी; फेऱ्या बंद, येणाऱ्या गाड्यांना मात्र राज्यात मुभा

उमरगाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्नाटकातून येणाऱ्या गाड्यांना परवानगी कशासाठी?

महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता शिरकाव लक्षात घेऊन कर्नाटक राज्य शासनाने महिनाभरापासून उमरगा तालुक्यालगत असलेल्या गुलबर्गा मार्गावरील खजुरी व हैदराबाद मार्गावरील तलमोड सीमेवर नाकेबंदी सुरू केली होती. आता कर्नाटक प्रशासनाने गुरुवारी दुपारपासून महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या लालपरीला प्रवेश बंद केल्याने तीन दिवसांपासून बसफेऱ्या बंद झाल्या आहेत. औरंगाबाद-गुलबर्गा बस खजुरी-कर्नाटक सीमेवर पोलिस प्रशासनाने थांबवली. प्रवाशांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असेल तरच कर्नाटक राज्यात प्रवेश दिला जाणार असल्याचा पवित्रा घेण्यात आल्यामुळे बस परत उमरगा आगारात आल्या. अचानक झालेल्या निर्णयामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली होती.

अनेक प्रवाशांना आडमार्गाचा अवलंब करत घर गाठण्याची वेळ आली. एक बस रोखल्यामुळे दुपारच्या चारनंतर उमरगा आगारातून जाणारी जालना-गुलबर्गा अाणि औरंगाबाद-गाणगापूर या दोन्ही बस आगार प्रशासनाने बसस्थानकात थांबवल्या. कर्नाटक प्रशासनाने खबरदारीचा घेतलेला निर्णय हा योग्य वाटत असला तरी कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बसेसना मात्र मुभा दिली जाते. कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या प्रवाशांना मात्र कोरोना निगेटिव्ह चाचणीचे बंधन नाही, फक्त जाणाऱ्यांना बंधन आहे. हा विरोधाभास वाहनातून प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना अडचणीचा ठरतोय. कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसच्या फेऱ्या महाराष्ट्रात अधिक आहेत. त्यांच्यासाठीही परतीच्या प्रवासादरम्यान हा नियम लागू असल्याचे सांगितले जात अाहे.

प्रवाशांची तारांबळ
कर्नाटक प्रशासनाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला कर्नाटक राज्याच्या हद्दीत प्रवेश बंद केला आहे. निगेटिव्ह चाचणीचा अहवाल असणाऱ्या प्रवाशांना केवळ सोडण्यात येणार असल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. यासंदर्भात आळंदच्या तहसीलदारांशी बोलणे झाले आहे. गुरुवारी दुपारी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांची तारांबळ झाली आहे. - प्रसाद कुलकर्णी, आगारप्रमुख, उमरगा.

सीमावर्ती भागातील नागरिकांची गोची
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील अणूर, गदलेगाव, तडोळा, खजुरी, कोतन हिप्परगा, तुगाव, होदलूर, एकंबा, उजळंब, मंठाळ, घोटाळ, लाडवंतीसह येथील बहुतांश नागरिकांना उमरगा येथे व्यापार, आरोग्य शिक्षण व दळणवळणासाठी यावे लागते. कर्नाटक राज्य पोलिस प्रशासनाने महाराष्ट्रातील बससेवा बंद केल्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. -व्यंकटेश नावडे, व्यापारी उजळंब.

महाराष्ट्र पोलिसांची नाकेबंदी कधी?
कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रातच सुरू आहे असे नव्हे, तर अन्य राज्यांतही कमी-अधिक प्रमाणात बाधित रुग्ण आढळून येत आहेत. उमरगा येथील आरोग्यनगरीत शिवाय कोविड सेंटरमध्ये शेजारच्या कर्नाटक राज्यातील बऱ्याच गावातील रुग्ण तपासणीत अधूनमधून पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून उस्मानाबाद प्रशासनाकडून कर्नाटकाच्या दोन्ही सीमेजवळ कधीपासून नाकेबंदी सुरू होईल याची प्रतीक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...