आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पश्चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीदिनी राजकीय वाद पेटला. व्हिक्टोरिया स्मारकात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रचंड नाराज झाल्या. कारण होते ममतांच्या भाषणावेळी ‘जय श्रीराम’च्या दिलेल्या घोषणा. यावर ममता म्हणाल्या, “सरकारी कार्यक्रमात मर्यादा पाळल्या जाव्यात. पंतप्रधानांनी कोलकाता दौरा केला याबद्दल मी त्यांची आभारी आहे. मात्र, कुणाला निमंत्रित करून त्यांचा अवमान करणे योग्य नाही. मी आता भाषण करणार नाही... जय हिंद, जय बांगला.’ ममतांनी असे नाराज होत भाषण संपवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू झाले.
मोदी म्हणाले, “नेताजींनी जगातील सर्वात मोठ्या सत्तेसमोर ठामपणे उभे राहत आव्हान दिले होते... मी स्वातंत्र्य मागणार नाही, हिसकावून घेईन. नेताजींमध्ये हे धाडस होते. आजचा दिवस हा नेताजींच्या जन्मदिन नव्हे, या दिवशीच खऱ्या अर्थाने सबंध भारताच्या स्वाभिमानाचा जन्म झाला होता. हावडा-कालका मेल आता नेताजी एक्स्प्रेस नावाने ओळखली जाईल.’ मोदी पुढे बोलताना म्हणाले, जगात जेव्हा महिलांना समानाधिकार देण्याच्या चर्चा सुरू होत्या तेव्हा नेताजींनी महिला रेजिमेंट स्थापन करून त्यांना लष्करात भरती केले होते. लाल किल्ल्यावर भारताचा ध्वज फडकावण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. मी पण लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला तेव्हा आझाद हिंद सेनेचीच टोपी परिधान केली होती. लक्ष्य गाठण्यासाठीचे नेताजींचे प्रयत्न मला नेहमी प्रेरणा देतात.
देशात दिल्लीच नव्हे, कोलकातासह चार क्रमवार राजधान्या हव्यात : ममता बॅनर्जी
केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती, परंतु ममता बॅनर्जी यांनी ते फेटाळून बंगालमध्ये देशनायक दिन म्हणून साजरा केला. ममतांनी कोलकात्यात सुमारे ८ किमी पदयात्रा काढली. दुपारी सव्वाबारा वाजता ही यात्रा सुरू केली. कारण, २३ जानेवारी १८९७ रोजी याच वेळी नेताजींचा जन्म झाला होता.
- मोदींच्या आगमनापूर्वी ममतांनी शक्तिप्रदर्शन केले. “कोलकाता देशाची राजधानी करावी. इंग्रज कोलकात्यातूनच देशावर राज्य करत होते. त्यामुळे क्रमवार ४ राजधान्या हव्यात,’ असे ममता म्हणाल्या. - नेताजींना रवींद्रनाथ टागोर यांना देशनायक संबोधले होते. आम्ही आझाद हिंद स्मारक उभारू. मोदींचे नाव न घेता ममता म्हणाल्या, त्यांनी पुतळे अन् संसद परिसरात कोट्यवधी खर्च केले : ममता. - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारीला सार्वत्रिक सुटी जाहीर करावी, अशी मागणी ममतांनी केली.
२०१९च्या निवडणुकीवेळी झाला होता गोंधळ
बंगालमध्ये जय श्रीराम घोषणेवरून गोंधळ होण्याची ही पहिली वेळ नाही. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत ममतांसमोर या घोषणा दिल्या तेव्हा त्या संतापल्या होत्या. आता मेमध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.