आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती निवडणूक:ममता बॅनर्जी यांनी 22 पक्षांना बोलावले, 18 आले; संयुक्त उमेदवार देण्यास सहमती

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. तथापि, विरोधी पक्षाकडून संयुक्त उमेदवार देण्याचे ठरले. बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादीसह १८ पक्ष सहभागी झाले.

बैठकीवेळी ममता यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना उमेदवार होण्याची विनंती केली, पण त्यांनी यास नकार दिला. यानंतर ममता यांनी प. बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी आणि जम्मू-काश्मीरचेमाजी सीएम फारूक अब्दुल्ला यांचे नाव सुचवले. त्यावर बैठकीला हजर असलेल्या पक्षांनी पक्षनेतृत्वाशी चर्चा केल्यानंतरच यावर निर्णय घ्या, असे सांगितले. गांधी २०१७ मध्ये युपीएकडून उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार होते. ते एनडीएच्या वेंकय्या नायडूंकडून पराभूत झाले होते. तथापि, शरद पवार पुढच्या आठवड्यात मुंबईत विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावू शकतात.

अधिसूचना जारी, पहिल्या दिवशी ११ नामांकन

१८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीची अधिसूचना मंगळवारी जारी करण्यात आली. सोबतच नामांकन प्रक्रियाही सुरू झाली. पहिल्या दिवशी ११ उमेदवारांचे नामांकन दाखल झाले.

काँग्रेसमुळे बैठकीपासून दूर राहिला टीआरएस

बैठकील टीआरएस, आप, बीजद, अकाली दल आणि टीडीपीकडून कोणीच आले नाही. टीआरएस म्हणाला, आम्ही काँग्रेससोबत मंचावर बसू शकत नाही. तर उमेदवार निश्चित झाल्यानंतरच आम्ही विचार करू, असे आपने सांगितले. असदुद्दीन ओवेसी म्हणाले, आम्हाला निमंत्रण नव्हते.

विरोधी पक्षांत असहमतीमुळे भाजप खुश

राष्ट्रपती निवडणुकीच्या इलेक्टाेरल काॅलेजमध्ये एनडीएकडे ४८% मते आहेत. यामुळे त्यांचा मार्ग सोपा आहे. वायएसआर काँग्रेस आणि बीजदचे समर्थन मिळण्याची अपेक्षा आहे. तरीही टीआरएस, बीजद आणि आप बैठकीला न आल्याने भाजप खुश आहे.

राजनाथ यांनी नाव विचारले, विरोधक म्हणाले- भाजपने सांगावे

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एकमतासाठी पवार, ममता, खरगे, बिहारचे सीएम नीतीश कुमार, ओडिशाचे सीएम नवीन पटनायक, आंध्राचे सीएम जगन रेड्डी, अखिलेश यादव, बसप प्रमुख मायावती यांच्याशी चर्चा केली. त्यांनी राष्ट्रपती उमेदवारासाठी सल्ला मागितला. तथापि, विरोधी पक्षनेते म्हणाले, आधी भाजपचा उमेदवार सांगा, मगच आम्ही सल्ला देऊ.

ममता बॅनर्जी यांनी २२ विरोधी पक्षांना बैठकीचे आमंत्रण दिले होते. बैठकीला जेडीएसचे माजी पीएम एच. डी. देवेगौडा, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे प्रमुख पवार, सपा प्रमुख अखिलेश यादव, नॅकाँचे उमर अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती, शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी, आरएलडीचे नेते जयंत चौधरी आणि आरजेडीचे मनोज सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...