आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांनी सोमवारी रात्री जयपूर विमानतळावर अटक केली. त्यांच्यावर मोरबी दुर्घटनेप्रकरणी अफवा पसरवल्याचा आरोप आहे. त्यांना सोमवारी रात्री जयपूर विमानतळावरून अटक करण्यात आली.
TMC खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी दिली माहिती
TMC खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी एका ट्विटद्वारे साकेत गोखले यांच्या अटकेची पुष्टी केली. ते म्हणाले - 'पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांनी सोमवारी रात्री जयपूरमध्ये उतरल्यानंतर अटक केली. गोखले नवी दिल्लीहून रात्री 9 च्या विमानाने जयपूरला गेले होते. ते जयपूरला उतरताच त्यांना अटक करण्यात आली.'
पोलिसांनी केले सामान जप्त
डेरेक पुढे म्हणाले की, 'साकेत गोखले यांनी मंगळवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास आपल्या आईला फोन करून गुजरात पोलिस त्यांना अहमदाबादला घेऊन जात असल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्यांना केवळ 2 मिनिटे बोलू दिले. त्यानंतर त्यांचा फोन व संपूर्ण सामान जप्त केले. मोरबी पूल दुर्घटनेवर ट्विट केल्याप्रकरणी अहमदाबाद सायबर सेलने त्यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे. तृणमूल व विरोधी पक्ष आता शांत राहू शकत नाहीत. भाजपने आपल्या राजकीय सूड उगवण्याच्या पद्धतीला उच्च पातळीवर नेले आहे.'
का झाली साकेत गोखलेंना अटक?
साकेत गोखले यांनी मोरबी ब्रिज दुर्घटनेनंतर ट्विटरवर एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनास्थळाला भेट दिल्याच्या मुद्यावर आक्षेप घेतला होता. ते म्हणाले होते - 'पंतप्रधान मोदींच्या मोरबी दौऱ्यावर 30 कोटींचा खर्च झाला. त्यातील 5.5 कोटी रुपये ‘वेलक,म, इव्हेंट मॅनेजमेंट व फोटोग्राफी’साठी होते ही बाब माहिती अधिकार कायद्यांमार्फत स्पष्ट झाली आहे. 5 कोटींपैकी प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत पीडित कुटुंबांना करण्यात आली,. मोदींचे कार्यक्रम व्यवस्थापन व पीआरची किंमत 135 जणांच्या आयुष्याहून मोठी आहे.'
गुजरात सायबर सेलने दाखल केला होता गुन्हा
त्यानंतर गुजरातच्या सायबर सेलने तृणमूल प्रवक्ते साकेत गोखले यांच्याविरोधात अफवा पसरवण्याचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेत तब्बल 135 जणांचा बळी गेला होता. दरम्यान, साकेत गोखले यांच्या अटकेचा मुद्दा येत्या काही दिवसांत चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.