आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर एक युवक जिवंत जळत असलेल्या अवस्थेत आढळून आला. गंभीररित्या भाजलेला हा युवक मदतीसाठी याचना करत होता. 'मला रुग्णालयात घेऊन चला, पोलिसांनी मला आग लावली.' असे तो म्हणत होता. त्याला काही नागरिकांनी रुग्णालयात नेले. रविवारी सकाळी उपचारादरम्यान इंदूरमध्ये त्याचा मृत्यू झाला. ही घटना कोयला फाटक परिसरातील आग्रा रोडवरील गाडी अड्डा चौकातील आहे. घटनेचे व्हिडिओही समोर आले आहेत. यात तो त्याला जाळल्याचा उल्लेखही करत आहे. तर पोलिस दावा करत आहेत की त्याने स्वतःला आग लावली.
तरुणाची ओळख आसिफ पेंटर अशी पटली असून तो गांधीनगर परिसरातील रहिवासी होता. पोलिसांनुसार दोन दिवसांपूर्वी लोकायुक्तांनी चिमनगंज ठाण्यातील कॉन्स्टेबल रवी कुशवाहला लाच घेताना रंगेहात पकडले होते. हा युवक त्याचाच साथीदार होता. आसिफ, आरोपी कॉन्स्टेबलचा एजंट म्हणून काम करत होता. लोकायुक्त त्याचा शोध घेत होते.
आसिफला दिली लाचेची रक्कम
दोन दिवसांपूर्वीच कॉन्स्टेबल रवीला क्रिकेट सट्टेबाजांकडून लाच घेताना पकडण्यात आले होते. तेव्हा लोकायुक्त टीम येताा बघून त्याने पळ काढला. लाचेची 25 हजारांची रक्कम एजंटला दिली. यादरम्यान लोकायुक्तांना कळाले की एजंटचे नाव आसिफ पेंटर आहे. रवीच्या हाताला रंग लागलेला होता. त्यामुळे त्याच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता.
आसिफची 2 लग्ने, छोटी मुलगी 6 महिन्यांची
आसिफचा मामेभाऊ सगीरने सांगितले की, आसिफने दोन लग्न केली होती. त्याने पहिल्या पत्नीला सोडले होते. तो दुसऱ्या पत्नीसोबत राहत होता. त्याला तीन अपत्ये आहेत. आसिफ पोलिस ठाण्यात पेंटिंग आणि दलालीचे काम करायचा. त्यामुळे त्याचे पोलिसांशी चांगले संबंध होते. आरक्षक रवी कुशवाह यांच्या केसमध्ये पोलिसांना संशय होता की लाचेचे 25 हजार रुपये रवीने आसिफला दिले होते. तेव्हापासून लोकायुक्त आसिफचा शोध घेत होते. चौकशीसाठी पोलिस त्याच्या घरीही गेले होते. मात्र तो घरी सापडला नव्हता.
घटनेच्या दीड तासानंतर पोलिस पोहोचले
लाचेच्या घटनेनंतर दोन दिवसांनी आसिफचा जळालेल्या अवस्थेतील पोलिसांवर आरोप करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिस दलात एकच खळबळ उडाली. घटनास्थळावर जाण्यास पोलिस टाळाटाळ करत राहिले. जवळपासच्या व्यापऱ्यांनी कपडे आणि पाणी टाकून आग विझवली. यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेच्या दीड तासानंतर पोलिस तिथे पोहोचले. माहिती मिळाल्यावर पोलिस अधीक्षक अभिषेक आनंदही दाखल झाले. नंतर तिथे चिमनगंज आणि कोतवाली ठाण्याचे अधिकारीही दाखल झाले आणि संयुक्त तपासाला सुरूवात करण्यात आली. आसिफची प्रकृती खालावल्यानंतर त्याला इंदूरला रेफर करण्यात आले. इंदूरमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिस म्हणाले - लोकायुक्तांनी आम्हाला कारवाईची माहिती दिली नाही
प्रत्यक्षदर्शींनुसार त्यांनी तरुणाला वाचवत रुग्णालयात पाठवण्यात मदत केली. पोलिसांना माहितीही दिली. मात्र चिमनगंज आणि कोतवाली ठाण्यापैकी कोणतेही पोलिस तिथे पोहोचले नाही. लोकायुक्त डीएसपी सुनील तलान यांनी सांगितले की दोन दिवसांपूर्वी चिमनगंज ठाण्याचा कॉन्स्टेबल रवी कुशवाहला ट्रॅप करण्यात आले होते. रवीने रक्कम आसिफला दिल्याचे लोकायुक्तांना कळाले होते. दोन दिवसांपासून लोकायुक्त टिम त्याचा शोध घेत होती. चिमनगंज ठाणे प्रभारी जितेंद्र भास्कर यांचे म्हणणे आहे की पेंटरविषयी लोकायुक्तांकडून आम्हाला कोणतीही लेखी माहिती देण्यात आली नव्हती की ते काय कारवाई करत आहेत. केवळ कॉन्स्टेबल ट्रॅप झाल्याचे आम्हाला माहिती होते.
घटना गंभीर, कठोर कारवाई करू
अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभिषेक आनंद यांनी सांगितले की घटना गंभीर आहे. तपास करत वस्तुस्थितीचा शोध घेतला जात आहे. ज्याचाही हलगर्जीपणा असल्याचे समोर येईल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. घटना कशी घडली याचा शोध घेतला जात आहे. तरुणाने स्वतःलाच पेटवले आहे की दुसऱ्या कुणी त्याला जाळले होते?
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.