आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहरिकेश दुबे नामक प्रवाशी दिल्लीहून कानपूरला जाणाऱ्या निलांचल एक्स्प्रेसच्या बोगीत विंडो सीटवर बसला होता. रेल्वे ट्रॅकवर काही काम सुरू होते. अचानक एक पहार (लोखंडी सळई) उसळली व काच तोडून थेट त्यांच्या गळ्यात जाऊन शिरली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मनाचा थरकाप उडवणारी ही घटना डाबर-सोमना स्थानकादरम्यान घडली.
रेल्वे कोचमध्ये घडली घटना
यासंबंधीच्या माहितीनुसार, हरिकेश दुबे नामक तरुण विंडो सीटवर बसला होता. या भागात रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. अचानक एक लोखंडी सळई (पहार) उडाली आणि काच फोडून थेट हरिकेश यांच्या गळ्यात जाऊन घुसली. त्यात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हरिकेश उत्तर प्रदेशच्या चांदा सुलतानपूर येथील गोपीनाथ यांचे सुपुत्र होते.
मृतदेह जीआरपीला सुपूर्द
मृत तरुणाच्या नातलगांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. मृतदेह सध्या शवगृहात ठेवण्यात आला आहे. रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत. ही दुर्घटना घडली तेव्हा रेल्वेचा वेग ताशी 110 किमीच्या आसपास होता. ही घटना डाबर-सोमना रेल्वे स्थानकाजवळ घडली. लोखंडी गज हरिकेश यांच्या गळ्यात शिरताच रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हे पाहून त्यांच्या शेजारी बसलेल्या प्रवाशांनी एकच आरडाओरडा केला. रेल्वे अलीगड रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर प्रवाशाचा मृतदेह जीआरपीला सुपूर्द करण्यात आला.
जवळ बसलेली महिला थोडक्यात बचावली
या भयावह दुर्घटनेत हरिकेश यांच्याजवळ बसलेली एक महिला थोडक्यात बचावली. महिला आपल्या सीटवर बसली होती. पहार तिच्या मानेजवळून गेली. त्या महिलेने रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले - रेल्वे खूप वेगात होती. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच ही घटना घडली. रेल्वेच्या आवाजामुळे त्याचा आवाज ऐकता आला नाही. पण काही सेकंदांनंतर पाहिले असता लोखंडी रॉड थेट त्याच्या मानेत घुसला होता. सीटवर सर्वत्र रक्त वाहत होते. हे पाहून माझ्यासह इतर प्रवाशांनी आरडोओरडा केला. कोचमध्ये अनागोंदी माजली. घाईगडबडीत रेल्वे थांबवून पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.
रुळांवर पडली होती पहार
ही आश्चर्यकारक घटना कशी घडली, यावर रेल्वे अधिकारी कोणतेही भाष्य करण्यास नकार देत आहेत. पण यासंबंधीच्या वृत्तानुसार, ही पहार रेल्वे रुळांवर पडली होती. रेल्वेचे चाक त्यावरून गेल्याने ती उसळली व खिडकी फोडून थेट हरिकेशच्या मानेत घुसली. ही पहार हरिकेशच्या मागच्या सीटपर्यंत पोहोचली होती, एवढा हा अपघात भीषण होता.
GRPने नातलगांना दिली माहिती
मृत तरुण हरिकेश सुलतानपूरहून आपल्या घरी जात होता. GRPने त्याच्याकडे आढळलेल्या ओळखपत्राच्या मदतीने त्याच्या कंपनीशी संपर्क साधला. त्यानंतर त्याच्या कुटुंबाचा नंबर घेऊन त्यांना या घटनेची माहिती दिली. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्याच्या घरी एकच रडारड सुरू झाली.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
उत्तर रेल्वेचे CPRO हिमांशु शेखर उपाध्याय यांनी सांगितले की, जीआरपी व आरपीएफने या घटनेची संयुक्त चौकशी सुरू केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यासह या प्रकरणी कायदेशीर कारवाईही केली जात आहे.
GRP निरीक्षक सुबोध यादव यांनी सांगितले की, या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुळावर काम करणाऱ्या मजुरांचाही शोध घेतला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.