आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिपूर हिंसाचार:आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू, बाजारपेठा उघडल्या; नीट-यूजी परीक्षा टाकली लांबणीवर

इंफाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
घरे दंगेखोरांनी पेटवून दिल्याने मणिपूरच्या मोइरांग येथील एका निवारा गृहात अनेकांनी आश्रय घेतला आहे. - Divya Marathi
घरे दंगेखोरांनी पेटवून दिल्याने मणिपूरच्या मोइरांग येथील एका निवारा गृहात अनेकांनी आश्रय घेतला आहे.

मणिपूर हिंसाचारात आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाला असून १०० वर लोक जखमी झाले आहेत. सर्वाधिक प्रभावित चुराचंदपूरमध्ये २३ जणांचा मृत्यू झाला आहे.

लष्कर व निमलष्करी दलाच्या तैनातीनंतर परिस्थिती सुधारली असल्याचे पोलिस महासंचालक पी. डोंगल यांनी सांगितले. शनिवारी इंफाळ खोऱ्यात बहुतांश दुकाने आणि बाजारपेठा पुन्हा सुरू झाल्या. लोक घरातून बाहेर आले. रस्त्यांवर वाहने धावू लागली आहेत. मात्र, काही भागात तणाव कायम आहे. पूर्व इंफाळ व पश्चिम जिल्ह्यांमध्ये जाळपोळीच्या तुरळक घटना घडल्या आहेत. आतापर्यंत १६,००० हून अधिक लोकांना हिंसाचारग्रस्त भागातून सुरक्षित स्थळी किंवा मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आले आहे. मणिपूरमधील जिरबाम जिल्ह्यातील ११०० हून अधिक लोकांनी शेजारच्या आसाममध्ये आश्रय घेतला आहे.

दरम्यान, देशातील प्रमुख एअरलाइन कंपनी इंडिगोने मणिपूरमधील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त उड्डाणे चालवण्याची घोषणा केली आहे. त्याच वेळी राज्यातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता एनटीएने रविवारी होणारी नीट-यूजी परीक्षा पुढे ढकलली आहे. आता येथे परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाईल.

चुराचांदपूर जिल्ह्यात चकमक, ५ अतिरेकी ठार
चुराचांदपूर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा दोन वेगवेगळ्या चकमकीत डोंगराळ भागात राहणारे पाच अतिरेकी मारले गेले. यामध्ये भारतीय राखीव बटालियनचे दोन जवानही जखमी झाले आहेत.