आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही. असे म्हणत राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदुत्ववादामधील फरक सांगितला. राहुल गांधी हे हिंदूविरोधी असल्याची टीका सातत्याने भाजपकडून करण्यात येत होती, त्यावर त्यांनी आज भाष्य केले. काँग्रेसच्या वतीने आज केंद्र सरकारच्या विरोधात 'महगाई हटाओ रॅली'चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आज जयपूरमध्ये राहुल गांधी बोलत होते.
मी हिंदू आहे, पण हिंदुत्ववादी नाही. मी हिंदू असून मी अहिंसेवर विश्वास ठेवतो. महात्मा गांधी हिंदू होते आणि गोडसे हिंदुत्ववादी होते. केंद्र सरकार हे हिंदुत्ववादी असून ते आपआपसात हिंसाचार घडवत आहेत. ही मंडळी सत्तेसाठी काहीही करू शकतात असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
हिंदू हा सर्व धर्मातील लोकांना मानतो तर हिंदुत्ववादी हे कोणत्याही धर्माला मानत नाही. तो फक्त हिंसाचारावर विश्वास ठेवतो. असे म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
प्रियंका गांधींचे टीकास्त्र
देशातील जनता महागाईने त्रस्त आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकार जाहिरातींवर खर्च करण्यात व्यस्त आहे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केंद्र सरकारवर केली आहे. जयपूरमध्ये आज काँग्रेसच्यावतीने केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात, वाढत्या महागाईविरोधात 'महगाई हटाओ' रॅलीचे आयोजन केले होते. त्यावेळी भाषणात प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
केंद्रातील सरकार हे निवडक उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोप देखील प्रियंका गांधी यांनी लावला आहे. केंद्र सरकार एकाच उद्योगपतींसाठी काम करत आहे. या सरकारमधील मंत्र्याच्या मुलाने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडले. त्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून न्यायाची अपेक्षा नाही. ते मंत्री अजूनही मंत्रिपदावर आहेत. उत्तर प्रदेश सरकार जाहिरातींवर कोट्यवधी खर्च करत आहे. मात्र, शेतकऱ्यांना खत पुरवठा करू शकत नाही. केंद्रातील सरकार असत्य, लोभी आणि लूट करणारी सरकार असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे.
जाहिरातींवर हजारो कोटी खर्च
"सरकार जाहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च करत आहे, पण शेतकऱ्यांना खते मिळत नाहीत. केंद्रात जे सरकार आहे ते तुमच्यासाठी काम करत नाही. हे सरकार काही लोकांसाठीच काम करत आहे. मोदी 70 वर्षांची चर्चा करतात, त्यांनी आपल्या 7 वर्षांचा हिशोब द्यावा. पंतप्रधान जगभर फिरतात, पण शेतकऱ्यांना भेटण्यासाठी दहा किलोमीटर जाऊ शकत नाही. असा घणागात प्रियंका गांधी यांनी केला आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या आजच्या रॅलीत मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली. प्रियंका गांधी यांनी म्हटले की, स्वयंपाकाचा गॅस एक हजार रुपये, खाद्य तेल 200 रुपयांपेक्षा अधिक दरावर मिळलत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. एक सरकार असते ज्यांना लोकांचे भले करायचे असते. तर, दुसरे सरकार असते ज्यांचा उद्देश्य भ्रष्टाचार आणि जनतेची लूट करण्याचा असतो. असा आरोप प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर लावला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.