आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Marathi News | Since The Introduction Of Omicron Virus In India, Vaccination Has Declined By 8.5%

विश्लेषण:भारतात जेव्हापासून ओमायक्रॉन आला, लसीकरण वाढण्याऐवजी 8.5% घटले

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव होऊन ९ दिवस उलटले आहेत. २ डिसेंबरला त्याचा पहिला रुग्ण सापडला होता. यामुळे केंद्र व राज्य सरकारांनी लसीकरण गतिमान करण्याची घोषणा केली होती. दुसरीकडे, जगातील ३० पेक्षा जास्त देशांनी बूस्टर डोसचा वेग वाढवला आहे. अमेरिका व युरोपातील बहुतेक देशांत बूस्टर डोस सक्तीचे केले जात आहे. भारतात मात्र बूस्टर तर लांबच, सामान्य लसीकरणाचाही वेग घटवला आहे. २ डिसेंबरला देशात रोजच्या लसींची सरासरी ८१.३९ लाख हाेती. ती आता ७४.४४ लाखांवर आली आहे. म्हणजे जगभरात लसीकरणाला वेग दिला जात असताना, भारतात मात्र ते ८.५% पर्यंत घटले आहे.

झारखंड, पंजाब, बिहार, यूपी व महाराष्ट्रात तर अद्याप ५०% पेक्षा जास्त प्रौढ लोकसंख्येला (१८+) दोन्ही डोस मिळालेले नाहीत. यामुळे मुलांच्या लसीकरणासाठी मोठी वाट पाहावी लागू शकते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. जगभरातील १०० पेक्षा जास्त देशांत मुलांचे लसीकरण सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला असताना भारतात मात्र विपरीत चित्र आहे.

महाराष्ट्र : १० जिल्हे मागेच, १.७५ कोटी नागरिकांनी चुकवला लसीचा दुसरा डोस
मुंबई | ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग वाढवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. लसीकरणात ठाणे, नाशिक, जळगाव, नगर, नांदेड, सोलापूर, औरंगाबाद, बीड, यवतमाळ, लातूर हे १० जिल्हे पिछाडीवर आहेत.
मुंबई जिल्ह्यात सर्वाधिक १३.९४%, पुणे ११.४८%, ठाणे ८.१६%, नाशिक ४.८६%, नागपुरात ४.५९% लसीकरण झाले आहे. या जिल्ह्यांत राज्याचे एकूण ४३.१४% लसीकरण म्हणजे, ५ कोटी १९ लाख १,५१३ डोस दिले आहेत. उर्वरित जिल्ह्यांत ५६.८६% लसीकरण म्हणजे, ६ कोटी ८४ लाख १६,७२७ डोस दिले आहेत. राज्याने १० कोटी मात्रांचा टप्पा ९ नोव्हेंबरला, तर ११ कोटींचा टप्पा २५ नोव्हेंबरला पार केला. राज्यात १० डिसेंबरपर्यंत १२ कोटी २७ लाख ४८,५९९ मात्रा देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ७.७३ कोटी लोकांना पहिली, तर ४.५३ कोटी लोकांना दोन्ही डाेस मिळाले आहेत. १८+ लोकसंख्येपैकी १ डोस घेतलेल्यांचे प्रमाण ८३.७४% आहे. १८ ते ४४ वयोगटातील लोकसंख्येत सिंगल डोस घेणाऱ्यांची संख्या ७६.६९% आहे. ४५ पेक्षा अधिक वयाच्या ८५.२५ टक्के नागरिकांना किमान एक मात्रा मिळाली आहे.

वेग वाढला नाही तर येत्या ३१ डिसेंबरपर्यंत सर्व प्रौढांना दोन्ही डोसचे उद्दिष्ट गाठणे अशक्यच
गुजरात, मध्य प्रदेश, केरळ आणि हिमाचल प्रदेश वगळता एकाही राज्यात गेल्या ११ महिन्यांत ७०% पेक्षा जास्त प्रौढ लाेकसंख्येला दोन्ही डोस देऊ देण्यात आले नाहीत. झारखंड, पंजाब आणि यूपीची स्थिती सर्वात बिकट आहे. या राज्यात लसीकरणाचा वेग वाढला नाही तर पुढील ११ महिन्यांतही ही राज्ये १००% प्रौढ लोकसंख्येला दोन्ही डोस देऊ शकणार नाही. म्हणजे, लहान मुलांना लसीकरणासाठी मोठी वाट पाहावी लागू शकते.

बूस्टर डोस... ब्रिटनमध्ये ३२% लोकसंख्येला बूस्टर लागला... कारण जग सध्या लसीच्या बळावर ओमायक्रॉनशी झुंजत आहे; बूस्टर आजाराचा गंभीरपणा कमी करतो

ओमायक्रॉनचे नवे ७ रुग्ण, एकूण १७
ओमायक्रॉन संसर्गाचे राज्यात शुक्रवारी आणखी ७ रुग्ण आढळले. यात मुंबईत ३ तर पिंपरी - चिंचवड शहरात ४ रुग्णांचा समावेश आहे. राज्यात आजवर एकूण १७ ओमायक्रॉन विषाणू बाधितांची संख्या झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...