आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MiG Aircraft Will Be Phased Out Of The Air Force By 2025| IAF Retiring MiG 21 Squadron By September End Entire Fleet To Be Out By 2025

2025 पर्यंत मिग विमाने हवाई दलातून हद्दपार:​​​​​​​श्रीनगरमधील 51 स्क्वाड्रन 30 सप्टेबरला होणार रिटायर, 3 वर्षांत सर्वच मिग होणार बाहेर

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मिग-21' लढाऊ विमानांना वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने देशाच्या सुरक्षेत महत्वाचे योगदान देणारी ही विमाने आपल्या ताफ्यातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये गुरूवारी मिग विमान कोसळले होते. त्यात 2 वैमानिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

51 स्क्वाड्रनने पाडले होते पाकचे F-16

श्रीनगर हवाई तळावर तैनात हे स्क्वाड्रन फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोटवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे चर्चेत आले. या हल्ल्यात मिग बायसन विमानाने पाकचे अत्याधूनिक एफ-16 विमान पाडले होते. याच स्क्वाड्रनचे मिग-21 विमान विंग कमांडर अभिनंदन वर्धमान उडवत होते.

सप्टेबर महिन्यानंतर हवाई दलाकडे मिग-21 विमानांचे केवळ 3 स्क्वाड्रन शिल्लक राहतील. यातील प्रत्येकी एक स्क्वाड्रन दरवर्षी रिटायर केले जाईल. म्हणजे 2025 पर्यंत मिग-21 विमानांचा ताफा हवाई दलातून पूर्णतः हद्दपार होईल.

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात गुरूवारी सायंकाळी मिग-21 कोसळले. त्यात 2 वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाडमेरच्या भीमदा गावात अर्धा किलोमीटरच्या परिसरात या विमानाचे अवशेष कोसळले. या अपघातामुळे पुन्हा एकदा भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील सोव्हियत वंशाच्या मिग-21 विमानातील त्रुटी पुन्हा एकदा अधोरेखित झाल्या होत्या. या विमानांचा 1960 च्या दशकात हवाई दलात समावेश झाला. तेव्हापासून आतापर्यंत त्याचे जवळपास 200 अपघात झालेत.

उडत्या शवपेट्या व 'विडो मेकर' नावाने कुप्रसिद्ध

मिग-21 च्या सुरक्षिततेचा रेकॉर्ड अत्यंत वाईट आहे. त्यामुळे भारतीय हवाई दल त्याच्या जागी SU-30 व स्वदेशी हलक्या लढाऊ विमानांचा आपल्या ताफ्यात समावेश करत आहे. पण, या प्रक्रियेत विलंब होत असल्यामुळे हवाई दलाला मिग विमानांशिवाय दुसरा पर्याय नव्हता. 1963 पासून भारतीय हवाई दलाला विविध श्रेणीतील 872 मिग लढाऊ विमाने मिळाली आहेत.

यातील जवळपास 500 फायटर जेट क्रॅश झालेत. त्यात 200 हून अधिक पायलट्स व 56 सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात झाल्यामुळे मिग-21 विमानांना उडत्या शवपेट्या व विडो मेकर म्हटले जाते.

रशिया-चीननंतर भारत मिग-21चा सर्वात मोठा ऑपरेटर

रशिया व चीननंतर भारताकडे तिसरा सर्वात मोठा मिग -21 विमानांचा ताफा आहे. 1964 मध्ये हे विमान पहिले सुपरसॉनिक फायटर जेट म्हणून एअरफोर्समध्ये समाविष्ट करण्यात आले होते. सुरुवातीचे जेट रशियात तयार झाले. पण, त्यानंतर भारताला या विमानांची निर्मिती करण्याचा अधिकार व तंत्रज्ञान प्राप्त झाले.

तेव्हापासून आतापर्यंत मिग-21 ने 1971 चे भारत-पाक युद्ध व 1999 च्या कारगिल युद्धासह अनेक महत्वाच्या प्रसंगात महत्वाची जबाबदारी निभावली आहे. रशियाने 1985 मध्ये या विमानाचे उत्पादन बंद केले. पण भारताने या विमानाच्या अद्ययावत व्हेरिएंटचा वापर करणे सुरुच ठेवले.

बातम्या आणखी आहेत...