आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांची पूजा:खाण सचिव पूजा सिंघल यांच्याकडे 150 कोटी रु. संपत्तीची कागदपत्रे, 25 कोटी रुपयांची रोकड सापडली

रांची13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंड केडरच्या २००० बॅचच्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या झारखंड-बिहारसह सात राज्यांतील २० ठिकाणांवर शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले. यात २५ कोटी रुपयांची रोकड सापडली. पूजा सध्या खाण सचिव आहेत. कारवाईत पूजा यांचे चार्टर्ड अकाउंटंट सुमनसिंह यांच्या रांची येथील निवासस्थानातून १९.३१ कोटी रु. जप्त केले. सुमारे १५० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रेही सापडली. ईडी मनरेगा घोटाळ्यासह त्यांच्या संपूर्ण कार्यकाळाची चौकशी करत आहे. ईडीने पूजा यांचे सासरे कामेश्वर झा यांचे मुजफ्फरपूरचे घर, दिल्लीत आई-वडिलांचे घर तसेच कोलकाता, मुंबई, जयपूर, गुरुग्राम आणि फरिदाबादमध्येही छापे टाकले. मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले, आम्ही कारवाईला भीत नाही. देशात कायदा आहे. घटना आहे. त्याच्याबाहेर कोणीही जाऊ शकत नाही.

२१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस, सर्व सीएमच्या जवळच्या
पूजा सिंघल फक्त २१ वर्षे ७ दिवस एवढे वय असताना पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाल्या होत्या. त्या सर्वच मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या राहिल्या, मग अर्जुन मुंडा असो, रघुवर दास असो की हेमंत सोरेन. कमी वयात आयएएस झाल्याने त्यांचा कार्यकाळ ३१ जुलै २०३८ पर्यंत आहे. त्या केंद्रात उच्च पदापर्यंत जाऊ शकत होत्या, असे मानले जात आहे. पण वादात राहिल्याने अन् आता ईडीच्या कारवाईनंतर त्या अडचणीत आल्या आहेत. त्यांनी १९९९ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी राहुल पुरवार यांच्याशी विवाह केला. २००४ मध्ये हजारीबागमध्ये राहुल उपायुक्त आणि पूजा एसडीओ होत्या. तेथे पती-पत्नीत वाद झाला. अखेर घटस्फोट झाला. २०१० मध्ये पूजा यांनी डॉ. अभिषेक झा यांच्याशी विवाह केला. अभिषेक यांचे रांचीत आलिशान रुग्णालय आहे. माजी सीएम रघुवर दास यांच्या कार्यकाळात ३५ हजार युवकांना नियुक्तिपत्र दिल्याने त्यांचे नाव लिम्का बुकमध्ये नोंदले गेले आहे.

मनमोहन सरकार 112 छापेमोदी सरकार2,974 छापे
संसदेत सादर आकड्यांनुसार, २००४ ते २०१४ पर्यंत मनमोहन सरकारच्या तुलनेत २०१४ पासून आतापर्यंत आठ वर्षांत आयटी आणि ईडीचे छापे २६ पट वाढले आहेत. यूपीए सरकारच्या काळात ११२, तर २०१४ पासून आतापर्यंत भाजप सरकारच्या काळात २,९७४ छापे पडले. २००४ ते २०१४ पर्यंत ५,४३६ कोटींची तर २०१४ ते मार्च २०२२ पर्यंत ९५,४३२ कोटींची रोख व संपत्ती जप्त केली. २००४ ते मार्च २०२२ पर्यंत प्राप्तिकरने व ईडीने ३,०८६ छापे टाकले. ४,९६४ गुन्हे नोंदले, ९४३ खटले दाखल झाले, पण फक्त २३ लोकच दोषी ठरले.

मनरेगा-खाणसह अनेक घोटाळ्यांत नाव जोडले
२०१३ मध्ये पलामूमध्ये पूजा उपायुक्त असताना खासगी कंपनीला कठौतिया खाण पट्टा वाटप केला. यावरूनही वाद झाला. त्याची अद्यापही चौकशी सुरू आहे. त्या चतरामध्ये मनरेगा योजनेत दोन एनजीओंना ६ कोटी रु. देण्यावरूनही चर्चेत आल्या आहेत. ही रक्कम मुसळी उत्पादनाच्या नावावर दिली होती, मात्र मनरेगामध्ये अशी तरतूद नव्हती. २००९-१० मध्ये पूजा खूंटी जिल्ह्याच्या उपायुक्त झाल्या तेव्हा मनरेगाच्या १८ कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत त्यांच्याविरुद्ध १६ गुन्हे दाखल झाले होते.

बातम्या आणखी आहेत...