आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकारात्मक बातमी:मंत्र्याच्या ताफ्याने 4 शेतकऱ्यांना चिरडले, शेतकऱ्यांच्या हल्ल्यात भाजपचे चौघे ठार

लखीमपूर खिरी/लखनऊ16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीत रविवारी हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांच्या कार्यक्रमात घेराव घालणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर दोन वाहने घालण्यात आली. दोन्ही वाहने अजय मिश्रांच्या समर्थकांची होती, ते याच कार्यक्रमास येत असलेले उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या स्वागतासाठी हेलिपॅडकडे जात होते. शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, काळे झेंडे दाखवत असलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर अजय मिश्रांचा मुलगा आशिष मिश्रा याने वाहने घातली. त्यात ४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. १० शेतकरी रुग्णालयात आहेत. दुसरीकडे, अजय मिश्रा म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी वाहनातील भाजपच्या ४ कार्यकर्त्यांना मारहाण केली, त्यात या चौघांचाही मृत्यू झाला. माझा मुलगा वाहनात नव्हता, असता तर त्यालाही ठार मारले असते.’

मिश्रांनी २६ सप्टेंबरला शेतकऱ्यांना आव्हान देत म्हटले होते की,‘स्वत:ला सुधारा, नाहीतर समोर येऊन मुकाबला करा. सुधारण्यासाठी फक्त दोन मिनिटे लागतील.’ रविवारी शेतकऱ्यांनी वाहने रोखल्यानंतर चकमक उडाली. वाहने निघून गेल्यानंतर जे लोक मागे राहिले त्यांना शेतकऱ्यांनी बेदम मारहाण केली.

हरियाणा : खट्‌टर भाजप कार्यकर्त्यांना म्हणाले-काठ्या घ्या, जामीन देऊ
‘आपली माणसे उभी करा. काठ्या घ्या. जशास तसे करा. जे होईल ते पाहून घेऊ. जामिनाची पर्वा करू नका. दोन-चार महिन्यांत जामीन मिळेल. तुरुंगात गेलात तर मोठे नेते व्हाल.’- मनोहरलाल खट्‌टर

२ तास संघर्ष...संपूर्ण परिसरात इंटरनेट बंद, प्रियंका गांधी लखनऊत स्थानबद्ध
अजय मिश्रांच्या बनवीरपूर या गावात कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनासाठी जात असलेले उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या दौऱ्याला शेतकरी विरोध करत होते. हिंसाचारानंतर मौर्य यांनी दौरा रद्द केला. या भागातील भाजप नेत्यांची सुरक्षा वाढवण्यात आली.

राकेश टिकैत आणि दर्शनपाल हे शेतकरी नेते रविवारी रात्री लखीमपूरला पोहोचले. ते म्हणाले की, सोमवारी देशभरातील जिल्हा मुख्यालयी निदर्शने होतील. दुसरीकडे, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा म्हणाले,‘शेतकरी आंदोलन सुरू झाल्यापासून त्यात बब्बर खालसासारख्या दहशतवादी संघटनांचे लोक सहभागी असल्याचे दिसत आहे. अशाच उपद्रवींनी ही घटना घडवली.’ दरम्यान, रात्री लखनऊत पाेहाेचलेल्या प्रियंका गांधींना स्थानबद्ध करण्यात आले.

शेतकरी म्हणाले- कालव्याचे पाणी मिळाल्यानंतरच पोलिसांना सोडून दिले जाईल. तोपर्यंत कोणाशी चर्चाही करणार नाही.
पोलिस म्हणाले... ४ मृतदेह रस्त्यावर होते; ४ मृतदेह वाहनांतून आलेल्यांचे होते, एफआयआरनंतर स्थिती स्पष्ट होईल
अजय मिश्रा म्हणाले... माझा मुलगा तेथे नव्हताच, शेतकऱ्यांनी आमच्या लोकांवर हल्ला केला, त्यात भाजपच्या ४ कार्यकर्त्यांचा मृत्यू
शेतकरी नेत्यांचा आरोप... केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रांचा मुलगा आशिषने वाहन अंगावर घातले; ४ शेतकऱ्यांना ठार केले

राजस्थान : १५० पोलिसांना शेतकऱ्यांनी बनवले बंधक
श्रीगंगानगर जिल्ह्यात इंदिरा गांधी कालव्यातून सिंचनासाठी पाण्याच्या मागणीवर सुनावणी न झाल्याने शेतकरी संतप्त झाले. हजारो शेतकऱ्यांनी घडसानात शनिवारी सायंकाळी ७ वाजता एएसपीसह १५० पोलिसांना बंधक बनवले. त्यांना रविवारीही सोडले नाही. शेतकरी गहलोत सरकारला विरोध करत आहेत. पोलिस त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...