आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mistri Would Have Been Saved If Rear Airbags Had Deployed, Latest News And Update

'मल्टीट्रॉमा'मुळे झाला सायरस मिस्त्रींचा मृत्यू:कार अपघातात आतील अवयवांना झाली होती गंभीर इजा; शवविच्छेदन अहवालात खुलासा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी दुपारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका अपघातात निधन झाले. ते गुजरातच्या उदवारा स्थित पारशी मंदिरातून परत येत होते. 54 वर्षीय मिस्त्री यांची मर्सिडीज GLC 220 कार पालघरच्या चारोटी गावालगतच्या सूर्या नदीच्या पुलावरील डिव्हायडरला धडकली. ही कार महिला डॉक्टर अनायता पंडोले चालवत होत्या.

पोलिसांच्या माहितीनुसार, अनायता पंडोले अत्यंत वेगात कार चालवत होत्या. त्यांनी चुकीच्या दिशेने (डाव्या) दुसऱ्या एका वाहनाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व कार थेट दुभाजकाला जाऊन धडकली. एका प्रत्यक्षदर्शीनेही याची पुष्टी केली आहे.

अनायता कार चालवत होत्या. तर त्यांचे पती जेएम फायनांशिअलचे सीईओ दरीयस पंडोले त्यांच्या बाजूला बसले होते. मिस्त्री व दरीयसचे वडील जहांगीर पंडोले त्यांच्या मागे बसले होते. धडकेमुळे कारच्या समोरच्या सीटवरील एअरबॅग्ज उघडल्या. पण मागच्या सीटवरील एअरबॅग्ज वेळेवर उघडल्या नाही. त्या उघडल्या असत्या तर कदाचित सायरस मिस्त्री वाचले असते. मॅन्युअलनुसार, मर्सिडीज जीएलसी 220 डी मध्ये किमान 7 एअरबॅग्ज आहेत.

'मल्टीट्रॉमा'मुळे झाला सायरस मिस्त्रींचा मृत्यू

शवविच्छेदन अहवालानुसार, अपघातात सायरस मिस्त्री यांच्या शरीराच्या आतील अवयवांना गंभीर जखम झाली होती. वैद्यकीय भाषेत त्याला पॉलीट्रॉमा (Polytrauma)असे म्हटले जाते. यामुळेच त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मुंबईच्या जेजे रुग्णालयात रविवारी रात्री उशिरा सायरस व जहांगीर यांचे पोस्टमॉर्टम झाले होते.

कारची न्यायवैद्यक तपासणी

मोटार वाहन निरीक्षक मनीष मोरे यांनी सांगितले की, सध्या अपघातग्रस्त कारची न्यायवैद्यक तपासणी सुरू आहे. त्यातून अपघाताचे खरे कारण कळेल. पोलिसांनी सांगितले - घटनास्थळी किंवा त्यांच्या कारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता. रस्त्याची स्थितीची चांगली होती. त्यामुळे अखेर चूक कुठे झाली याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी कार चालवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचेही संकेत दिलेत. गाडी कुणाच्या नावावर आहे, याचाही शोध घेतला जात आहे.

अनयाता-दरीयस ब्रीच कँडी रुग्णालयात वर्ग

अपघातानंतर अनायता व दरीयस याच्यावर वापीच्या इंद्रधनुष्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी येथील डॉक्टर तेजस शाह यांनी सांगितले की, अनायता व दरीयस पंडोले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यांचा ऑक्सिजन लेव्हल घसरला होता. रक्तदाबही उच्च होता. त्यांना खूप सारे फ्रॅक्चर होते. त्यांना सोमवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले.

मिस्त्रींची पत्नी व मुलगा ब्रिटनमध्ये

सायरस मिस्त्री यांचा मुलगा व पत्नी फॅमिली फंक्शनसाठी यूकेमध्ये आहेत. सोमवारी ते मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. रविवारी मिस्त्री यांचे सासरे व ज्येष्ठ वकील इक्बाल छागला तथा त्यांचे मेहुणे न्यायमूर्ती रियाझ छागला पोलिस व पालघर प्रशासनाच्या संपर्कात होते.

दपारी 3.30 च्या सुमारास झाला अपघात

पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या माहितीनुसार, 'मिस्त्री MH-47-AB-6705 क्रमांकाच्या कारने प्रवास करत होते. अपघात दुपारी 3.30 च्या सुमारास अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील सूर्या नदीच्या पुलावर झाला. त्यात 2 जण ठार, तर 2 जण जखमी झाले.'

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मिस्त्री यांच्यासह सर्वच जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे सायरस व अन्य एकाला मृत घोषित करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू आहेत.

अपघाताशी संबंधित 5 फोटो पाहा...

मर्सिडीज बेंझच्या अपघातानंतर सायरस मिस्त्री (उजवीकडे) व कार चालवणारी महिला डॉक्टर (डावीकडे) असे पडले होते.
मर्सिडीज बेंझच्या अपघातानंतर सायरस मिस्त्री (उजवीकडे) व कार चालवणारी महिला डॉक्टर (डावीकडे) असे पडले होते.
अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कारमधून बाहेर काढले.
अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कारमधून बाहेर काढले.
अपघातात सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज बेंझ GLC 220 कारच्या पुढील भागाचा असा चुराडा झाला होता.
अपघातात सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज बेंझ GLC 220 कारच्या पुढील भागाचा असा चुराडा झाला होता.
सायरस मिस्त्रींची कार मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सूर्या नदीवरील पुलावरील डिव्हायडरला धडकली होती.
सायरस मिस्त्रींची कार मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सूर्या नदीवरील पुलावरील डिव्हायडरला धडकली होती.
मुंबई-अहमदाबाद हायवेवरील अपघातानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मिस्त्रींची कार महामार्गावरून बाजूला काढली.
मुंबई-अहमदाबाद हायवेवरील अपघातानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मिस्त्रींची कार महामार्गावरून बाजूला काढली.

मिस्त्री उदवाराच्या पारशी मंदिराचा खर्च उचलत

मिस्त्री उदवारा स्थित पारशी मंदिरात मुंबईकडे येत होते. या मंदिराच्या पुजाऱ्याने सांगितले की, मिस्त्रींच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण पारशी समाजाला धक्का बसला आहे. वडील पालोनजी यांच्यानंतर सायरसने आमच्या इराणशाह (अग्नि मंदिराचा) जीर्णोद्धार केला. शापोरजी पालोनजी ग्रुपने पारशी समाजाच्या विकासासाठी सर्वाधिक देणगी दिली.

येथील धर्मशाळेच्या देखभालीचा व नूतनीकरणाचा सर्व खर्च ते उचलतात. येथे कोणताही कार्यक्रम झाला की त्यांच्या घरातील लोक आधी पोहोचायचे. त्यांच्या कुटुंबीयांना इराणशाह हे दुःख सहन करण्याची ताकद देवो.

गत जून महिन्यातच झाले होते वडिलांचे निधन

सायरस यांचे वडील व विख्यात उद्योगपती पालोनजी मिस्त्री (93) यांचे गत 28 जून रोजीच निधन झाले होते. आता सायरस यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबात त्यांच्या मातोश्री पाट्सी पेरिन डुबास, शापूर मिस्त्रींसह लैला मिस्त्री व अलू मिस्त्री या 2 बहिणी राहिल्या आहेत.

टाटा समूहाचे 6 वे अध्यक्ष होते सायरस

रतन टाटा यांनी डिसेंबर 2012 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सायरस मिस्त्री यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले होते. सायरस टाटा सन्सचे सर्वात तरुण चेअरमन होते. मिस्त्री कुटुंबीयांची टाटा सन्समध्ये 18.4 टक्के भागिदारी आहे. ते टाटा ट्रस्टमधील टाटा सन्सनंतर दुसरे मोठे समभागधारक आहेत.

24 ऑक्टोबर 2016 रोजी हकालपट्टी

सायरस मिस्त्री यांची अवघ्या 4 वर्षांतच 24 ऑक्टोबर 2016 रोजी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या जागी पुन्हा रतन टाटा यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर 12 जानवारी 2017 रोजी एन. चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.

या वादानंतर टाटा सन्सने सायरस मिस्त्री यांच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सायरस यांच्या कामाची पद्धत टाटा समूहाच्या कामाच्या पद्धतीशी सुसंगत नाही. त्यामुळे संचालक मंडळाने त्यांच्यावर अविश्वास दाखवल्याचे टाटा सन्सने म्हटले होते. सायरस 150 हून अधिक वर्षांची परंपरा असणाऱ्या टाटा समूहाचे 6 वे अध्यक्ष होते.

बातम्या आणखी आहेत...