आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लाँड्रिंग:लालूंचे कुटुंबीय, राजद नेत्यांच्या घरे-परिसरावर ईडीचे धाडसत्र

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नोकरीसाठी जमीन घोटाळ्यात दिल्ली, रांची, मुंबईसह अनेक ठिकाणी कारवाई

ईडीने नोकरीसाठी जमीन घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगच्या तपासासाठी शुक्रवारी बिहारसह अनेक शहरांत छापेमारी केली. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या तीन कन्या, राजद नेत्यांच्या घर-परिसरावर ही कारवाई झाली. अधिकारी म्हणाले, पाटणा, फुलवारी शरीफ, दिल्ली-एनसीआर, रांची व मुंबईत लालूंच्या मुली रागिणी यादव, चंदा यादव व हेमा यादव तसेच राजदचे माजी आमदार अबू दोजानाच्या परिसरांत हे छापे टाकण्यात आले. केंद्रीय सुरक्षा दलाच्या सुरक्षा कवचासह सुमारे दोन डझन ठिकाणी ही कारवाई झाली. लालूंचे पुत्र तथा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या दक्षिण दिल्लीतील निवासस्थानीही छापा पडला. २००४ ते २००९ दरम्यान लालू यादव रेल्वेमंत्री होते. तेव्हा त्यांच्या कुटुंबाला भेट म्हणून भूखंड मिळाला किंवा त्याच्या बदल्यात रेल्वेत नोकरी देण्याशी संबंधित हे प्रकरण आहे. सीबीआयने या प्रकरणात गुन्हेगारी षड‌्यंत्र व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार लालू, त्यांची पत्नी तथा माजी मुख्यमंत्री राबडीदेवी आणि इतर १४ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. सर्व आरोपींना १५ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. विरोधी नेत्यांच्या विरोधातील छापेमारीत सीबीआय व ईडी एखाद्या पटकथेसारखे काम करू लागले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बिहारमध्ये सरकार बदलले. छाप्याची कारवाई म्हणजे त्याचीच प्रतिक्रिया असल्याचा आरोप राजद नेते मनोज झा यांनी केला.

दिल्ली : सिसोदिया १७ मार्चपर्यंत ईडीच्या ताब्यात
नवी दिल्ली
दिल्लीच्या एका न्यायालयाने माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची १७ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी केली आहे. दिल्लीतील अबकारी धाेरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सिसोदियांना अटक केली होती. सिसोदियांच्या जामीन अर्जावर कोर्ट आता २१ मार्च रोजी दुपारी दोन वाजता सुनावणी करेल.

न्यायाधीश एम.के. नागपाल यांनी मनी लाँड्रिंगविरोधी तपासासाठी सिसोदियांना ताब्यात घेऊन चौकशीची परवानगी दिली. ईडीने १० दिवसांची कोठडी मागितली होती. सीबीआयने सिसोदियांना दिल्लीच्या अबकारी धोरणातील घोटाळ्यात अटक केली होती. ईडीने मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात तिहार तुरुंगात सिसोदियांची चौकशी केली आणि गुरुवारी त्यांना अटक केली. आणखी ७ जणांना नोटिसा पाठवल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...