आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंर नवीन सदस्यांचा शपथविधी पार पडला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन मंत्र्यांचा परिचय करून देण्यासाठी उभे होताच विरोधकांनी एकच गदारोळ घातला. विरोधकांच्या घोषणाबाजीतच मोदींनी आपल्या मंत्र्यांचा परिचय दिला. यानंतर निधन झालेल्या लोकसभा सदस्यांची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी दिली.
महिला, दलितांना मंत्री केल्याचे काहींना बघवत नाही - मोदी
संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी महागाई आणि शेतकरी आंदोलनासह विविध मुद्द्यांवर एकच गदारोळ घातला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला. मोदी मंत्र्यांचा परिचय करून देत होते त्यावेळी सुद्धा विरोधकांनी गोंधळ घातला. यावर महिला आणि दलितांना मंत्री केल्याचे काहींना बघवत नाही असे मोदी म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "मला तर वाटत होते आज सभागृहात उत्साहाचे वातावरण राहील. कारण मोठ्या संख्येने महिला, दलित बंधू, आदिवासी आणि शेतकरी कुटुंबातील खासदारांना मंत्री करण्यात आले आहे. त्यांचा परिचय करून देताना मला आनंद होत आहे. परंतु, महिला, दलित, ओबीसी आणि शेतकरी पुत्रांना मंत्री केले हे बहुतेक काहींना ते बघवत नाही. त्यांचा परिचय सुद्धा देऊ देत नाहीत." यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आले.
अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच मोदींचे आवाहन
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होण्यापूर्वीच मोदींनी खासदारांना शांतता राखण्याचे आवाहन केले. संसद परिसरात माध्यमांना संबोधित करताना मोदी म्हणाले, "मी सर्व खासदारांना विनंती करतो की त्यांनी कठिणातील कठिण प्रश्न विचारावे. कितीही वेळा प्रश्न करावे. पण, शांतता बाळगून सरकारला देखील बोलण्याची संधी द्यावी." अधिवेशनात सार्थक आणि परिणामकारक चर्चा व्हायला हवी. यातून जनतेला माहिती मिळते. देशाचा वेग वाढतो. देशातील जनतेला उत्तर हवे आहे आणि ती उत्तरे द्यायला सरकार तयार आहे."
बाह्यांवर लस टोचा, बाहुबली व्हा -पीएम
याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना लसीकरणाचे आवाहन केले आहे. "सर्वांना कोरोना लसीचा एक डोस लागला असेल अशी अपेक्षा बाळगतो. सर्वांना प्रार्थना करतो की त्यांनी प्रोटोकॉलचे पालन करण्यात सहकार्य करावे. बाह्यांवर जेव्हा व्हॅक्सीन लावली जाते तेव्हा तुम्ही बाहुबली होता. कोरोना काळात बाहुबली होण्याची हीच एक पद्धत आहे. कोरोना विरोधात आतापर्यंत 40 कोटी लोक बाहुबली झाले आहेत. पुढे सुद्धा हेच काम झपाट्याने व्हायला हवे. या महामारीने अख्ख्या जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे." असे पंतप्रधान म्हणाले आहेत.
या अधिवेशनात 2 अर्थविषयक विधेयकांसह 31 विधेयक मांडले जाऊ शकतात. 13 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. काँग्रेस खासदार मनीष तिवारी लोकसभेत कृषी कायद्यांच्या विरोधात प्रस्ताव मांडणार आहेत. या अधिवेशनात कायदे मंजूर करण्यावरच सरकारचा भर राहील. परंतु, कृषी कायदे, शेतकरी आंदोलन, वाढती महागाई आणि कोरोनासह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. अशात पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.